कुणाल जमदाडे, झी मीडिया, शिर्डी : अहमदनगर (ahmednagar crime) जिल्ह्यातील एक विवाह सोहळा अगदी रंगात आला होता. दोन्ही बाजूकडील नातेवाईकांच्या गर्दीने मंगलकार्यालय खचाखच भरले होते. लग्न घटिका समीप आली होती. मात्र अचानक मंगलकार्यालयात पोलिसांची एन्ट्री झाली आणि नवरदेव बोहल्यावर चढण्याऐवजी थेट जेलमध्ये गेला. अहमदनगरच्या राहता येथे हा सर्व धक्कादायक प्रकार घडलाय. भर वरातीमधून पोलिसांनी (ahmednagar police) नवरदेवाला (Groom) थेट पोलीस ठाण्यात नेल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
अहमदनगरच्या राहाता येथील एका मुलीचा विवाह नाशिक शहरात राहणाऱ्या पंकज याच्याशी ठरला होता. 21 मे रोजी राहाता येथील मंगलकार्यालयात या विवाह सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती. लग्न घटिका समीप आल्याने दोन्ही बाजूकडील नातेवाई आणि मित्र परिवाराचा उत्साह शिगेला होता. नवरदेव पंकज वाजतगाजत विवाहस्थळी पोहचला. मात्र तो बोहल्यावर चढण्याआगोदरच त्याची प्रेयसी राहाता पोलिसांसह विवाहस्थळी पोहचली. पंकजने लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षांत वारंवार शरीरसंबंध ठेवून फसवणूक केल्याचे त्याच्या प्रेयसीने सांगितले. त्या तरुणीने हकीकत सांगताच विवाहस्थळी एकच खळबळ उडाली.
पंकजचे कारनामे ऐकून नवरीसह तिच्या घरच्यांचा पारा चांगलाच चढला आणि नवरीने तात्काळ लग्न नकार देत हा विवाह रद्द केला. राहाता पोलिसांनी यानंतर पंकज याला ताब्यात घेत त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने तरुणीशी संबंध असल्याची कबुली दिली. तरुणीने आरोप करण्यापूर्वी कलवरे, कलवऱ्या यांच्या गराड्यात असणारा नवरदेव पोलीस स्टेशनला मात्र एकटाच दिसत होता.
"पंकजने लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षांत अनेकदा शारीरिक संबंध ठेवल्याचा दावा पिडीत तरुणीने केला आहे.. त्यामुळे पिडीतेच्या फिर्यादीवरून पंकज याच्यावर भादवि कलम 376 आणि 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा गुन्हा आता नाशिकरोड पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून पंकज याला देखील नाशिकरोड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे," अशी माहिती राहात्याचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली आहे.
"रविवारी सकाळी 11 वाजता नाशिकमधून आलेल्या एका पीडितेने तक्रार केली की, नाशिक रोड येथील एक युवक चार वर्षांपासून मला लग्नाचे आमिष दाखवून जबरदस्तीने शारिरीक संबंध ठेवत आहे. तो आज राहत्यामध्ये लग्न देखील करणार आहे. या तक्रारीनंतर आम्ही पथक पाठवले आणि तरुणाला ताब्यात घेतले आहे. तरुणाने याबाबत कबुली दिली आहे. ही घटना नाशिकरोड हद्दीतील असल्याने हे प्रकरण नाशिक पोलिसांकडे सोपवण्यात आले," अशी माहिती, पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांनी दिली
पंकजने अगोदर प्रेयसीला लग्नाचे आमिष दाखवून चार वर्षे तिची फसवणूक केली. मात्र राहाता पोलीस वेळीच विवाहस्थळी पोहचल्याने दुसरी तरुणी फसवणूक होण्यापूर्वी वाचली आणि बोहल्यावर चढण्याआधीच पंकजवर तुरुंगामध्ये जाण्याची वेळ आली. त्यामुळे प्रेमसंबंध किंवा ''शुभमंगल'' जुळवताना ''सावधान'' राहा अन्यथा असे ठगसेन तुमचीही फसवणूक करू शकतात.