शरद पवार यांची पूजा करूनच आम्ही राज्यात काम करतो; अजित पवार गटाच्या मंत्र्याचे वक्तव्य चर्चेत

अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. मात्र, दोन्ही गटाच्या नेत्यांकडून सातत्याने करण्यात येत असलेली वक्तव्ये चर्चेत येत आहेत. 

Updated: Sep 10, 2023, 07:13 PM IST
शरद पवार यांची पूजा करूनच आम्ही राज्यात काम करतो; अजित पवार गटाच्या मंत्र्याचे वक्तव्य चर्चेत title=

Sharad Pawar : राष्ट्रवादीत नेमकं चाललयं काय? असा प्रश्न उपस्थित करणारे वक्तव्य सत्तेत असलेल्या अजित पवार गटातील एका बड्या मंत्र्याने केले आहे. शरद पवार आमचे दैवत आहेत. त्यांची पूजा करूनच आम्ही राज्यात काम करतो असे वक्तव्य  माहिती क्रीडा व युवक‌ कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी केले आहे.  संजय बनसोडे यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. 

नेमकं काय म्हणाले  संजय बनसोडे?

मंत्री संजय बनसोडे आज विठ्ठल रूक्मिणी दर्नसाठी पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद‌ साधला. आम्ही कुठे ही असलो तरी शरद पवार हे आमचे दैवत आहेत. त्यांची पूजा करूनच आम्ही राज्यात काम करतो असं वक्तव्य मंत्री संजय बनसोडे यांनी केले. मी राज्याचा फुल टाईम क्रीडा मंत्री आहे. मागील दोन महिन्यामध्ये अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. लवकरच पुण्यात ऑलम्पिक भवन उभारण्यात येणार आहे, अशी देखील संजय बनसोडे यांनी दिली. औरंगाबादला क्रीडा विद्यापीठ, पुण्याला आंतरराष्ट्रीय क्रिडा विदवयापीठ आणि आॅलम्पिक भवन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच ही कामे सुरू करण्यात येणार आहेत. प्रो गोविंदाला खेळाचा दर्जा देण्यात आला आहे असेही संजय बनसोडे म्हणाले.

आमच्यावर शरद पवारांचा आशीर्वाद

आमच्यावर  शरद पवारांचा आशीर्वाद आहे असं विधान अजित पवार गटाचे बडे नेते असलेल्या प्रफुल्ल पटेल यांनी काही दिवसांपूर्वी केले होते. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली होती. 

राष्ट्रवादीत फूट पडली नसल्याचे जयंत पाटील यांचे वक्तव्य

'राष्ट्रवादीत फूट पडली नाही असं मोठं विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी केले होते. सर्वांनाच शरद पवारांचं नेतृत्व मान्य आहे. सर्वजणं पवारांसाठीच काम करत असल्याचेही जयंत पाटील म्हणाले होते. 

राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय? 

2 जुलै 2023 रोजी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा राजकीय भूकंप झाला होता. अजित पवार यांचा मोठा गट शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील झाला. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या 9 आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांच्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडली आहे. शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट राष्ट्रवादीत पडले आहेत. राष्ट्रवादीत दोन गट असले तरी नेत्यांच्या वक्तव्यामुळे राष्ट्रवादीत नेमकं चाललंय काय?  असा प्रश्न उपस्थित झाला आहे.