अजित पवारांनी वर्धापन सोहळ्यात केला शरद पवारांचा उल्लेख; उपस्थितांनी टाळ्या वाजवून केलं कौतुक, म्हणाले 'साहेबांनी...'

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात अजित पवारांनी (Ajit Pawar) शरद पवारांचा (Sharad Pawar) उल्लेख केला. तसंच लोकसभा निवडणुकीच्या निकालावर विश्लेषणही केलं.   

शिवराज यादव | Updated: Jun 10, 2024, 09:09 PM IST
अजित पवारांनी वर्धापन सोहळ्यात केला शरद पवारांचा उल्लेख; उपस्थितांनी टाळ्या वाजवून केलं कौतुक, म्हणाले 'साहेबांनी...' title=

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सोहळ्यात अजित पवारांनी (Ajit Pawar) पक्षाच्या स्थापनेपासून ते आतापर्यंतचा प्रवास मांडला. यावेळी त्यांनी शरद पवारांचाही (Sharad Pawar) उल्लेख केला. तसंच लोकसभा निवडणुकीच्या निकालावर विश्लेषणही केलं. मी भाषणात सांगत असतो काळ वेळ कुणासाठी थांबत नसते आणि तशा पद्धतीने फक्त फक्त पंचवीस वर्षे पूर्ण झाले असं अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होत असताना मला आठवतंय की, अनेकांनी पायाला भिंगरी बांधली होती असं सांगताना त्यांनी भुजबळ मुलुख मैदानी तोफ होते असं कौतुक केलं. 

दरम्यान अजित पवारांनी यावेळी शरद पवारांचा उल्लेख केला असता उपस्थितांनीही टाळ्या वाजवून दाद दिली. अजित पवारांनी यावेळी 24 वर्षं पक्षाचं नेतृत्व केल्याबद्दल शरद पवारांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. "राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेपासून 24 वर्षं पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या आदरणीय पवार साहेबांनी पक्षाला दिलेल्या समर्थ नेतृत्वाबद्दल पक्षाच्या आणि सर्वांच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करतो," असं अजित पवारांनी म्हटलं असता उपस्थितांनी टाळ्या वाजवून समर्थन केलं. 

यावेळी त्यांनी सांगितलं की, "छगन भुजबळ यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला. अरुण गुजराती, पद्मसिंह पाटील यासारखे नेते होते. आम्ही दुसऱ्या फळीत होतो. काही नेते आज आपल्यात नाहीत. दिग्विजय खानविलकर, स्वर्गीय आर आर पाटील, असे अनेक नेते होते. या सर्वांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो". 

"NDA 300 चा आकडा पार करेल"

"हे सरकार 5 वर्षं टिकवायचं आहे. समोरचे लोक पुन्हा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न करतील. अधिवेशनानंतर 284 चा आकडा 300 च्या पुढे जाईल हे तुम्ही पाहा. सीएएए संदर्भातही खोटं सांगण्यात आलं. वाटेल ते खोटं रेटून बोलत आहेत," असा संताप अजित पवारांनी व्यक्त केला आहे. पराभवाची जबाबदारी मी स्विकारील असून, मला इतर कोणावर ढकलायचं नाही. जे घटक दूर गेले आहेत त्यांना पुन्हा जोढम्याचं काम करायचं आहे असंही ते म्हणाले. 

"राज्यसभेत 3 सदस्य असतील"

"पहिल्याच बैठकीत नरेंद्र मोदींनी मी सर्व घटकपक्षांनी वेळ देऊ शकत नसल्याचं सांगितलं होतं. त्यांनी स्वतंत्र कराभार आणि राज्यमंत्रीपद देण्याबाबत सांगितलं होतं. 1 जुलै किंवा 15 ऑगस्टपर्यंत राज्यसभेत आपले 3 सदस्य पाहायला मिळतील. आम्ही प्रफुल्ल पटेल यांचं नाव सुचवलं होतं. त्यांनी कॅबिनेट मंत्रीपद हाताळलं असल्याने स्वतंत्र कारभार पाहणं आम्हाला पटत नसल्याचं सांगितलं. एकनाथ शिंदे यांनाही स्वतंत्र कारभार दिल्याचं ते म्हणाले. त्यावर आम्ही जर तुम्हाला जमत नसेल तर पद स्विकारणार नाही असं सांगितलं. आम्ही एनडीएच्या पाठीशीच राहू. पण त्याचा विपर्यास करत चुकीच्या बातम्या देण्यात आल्या," असा दावा अजित पवारांनी केला आहे.