अजित पवार 24 तासात पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला, म्हणाले 'आमच्या पाठीशी उभे राहा', चर्चा सुरु

NCP Crisis: राष्ट्रवादीत बंड पुकारुन सत्तेत सहभागी झालेले अजित पवार (Ajit Pawar) पुन्हा एकदा शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीला पोहोचले आहेत. अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेलही भेटीसाठी दाखल झाले असून चर्चा सुरु आहे.   

शिवराज यादव | Updated: Jul 17, 2023, 03:22 PM IST
अजित पवार 24 तासात पुन्हा एकदा शरद पवारांच्या भेटीला, म्हणाले 'आमच्या पाठीशी उभे राहा', चर्चा सुरु title=

NCP Crisis: राष्ट्रवादीत बंड पुकारुन सत्तेत सहभागी झालेले अजित पवार (Ajit Pawar) पुन्हा एकदा शरद पवारांच्या (Sharad Pawar) भेटीला पोहोचले आहेत. अजित पवार यांच्यासह प्रफुल्ल पटेलही (Prafull Patel) भेटीसाठी दाखल झाले असून चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे, रविवारीही अजित पवार आपल्या सर्व समर्थक आमदारांसह शरद पवारांच्या भेटीला दाखल झाले होते. त्यानंतर 24 तासातच पुन्हा एकदा भेट होत असल्याने चर्चांना उधाण आलं आहे. या भेटीतून शरद पवारांची मनवळणी करण्याचा प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. 

अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल हे शरद पवार यांच्याशी चर्चा करत आहे. अजित पवार गटाची मतं जाणून घ्या अशी विनंती यावेळी दोघांकडून करण्यात येत आहे. तसंच महायुतीच्या पाठीशी उभे राहा असं आवाहन करण्यात आलं आहे. भविष्याच्या दृष्टीने सत्तेत सहभागी व्हावं असं मत अनेक आमदारांचं असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान, या भेटीत काही तोडगा निघतो का हे पाहावं लागणार आहे. 

शरद पवारांच्या गटातील आमदारांची 2 वाजता बैठक होणार होती. याआधीच अजित पवार आणि प्रफुल पटेल यशवंतराव चव्हाण सेंटरवर दाखल झाले. त्यामुळे आता शरद पवार समर्थक आमदार प्रदेश कार्यालयात जाणार आहेत. अजित पवारांच्या आमदारांना न भेटण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, सुनील भुसार प्रदेश कार्यालयात गेले आहेत. जयंत पाटील यांनी सर्व आमदारांना प्रदेश कार्यालयात जामण्याचे आदेश दिले आहेत. 

 

रविवारीही घेतली भेट

"आमचं सर्वांचं दैवत, नेते आदरणीय शरद पवारांचा आशीर्वाद घेण्यासाठी आम्ही आलो होतो. आम्ही वेळ मागितली नव्हती. आम्ही सर्व अजित पवारांच्या घरी होतो, त्यावेळी आम्हाला शरद पवार बैठकीसाठी वाय बी चव्हाण सेंटरला आल्याची माहिती मिळाली होती. म्हणून संधी साधून आम्ही आलो होतो," अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार भेटीनंतर दिली होती.

पुढे त्यांनी सांगितलं होतं की, "शरद पवारांच्या पाया पडत आम्ही आशीर्वाद मागितले. आम्हा सगळ्यांच्या मनात त्यांच्यासाठी आदर आहेच. पण राष्ट्रवादी एकसंघ कसा राहील याच्यासाठीही त्यांनी योग्य विचार करावा आणि मार्गदर्शन करावं अशी विनंती केली. शरद पवारांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांन आमची मंत. विचार, विनंती ऐकून घेतली".