औरंगाबाद : एमआयएम (AIMIM) पक्षाचे आमदार अकबरुद्दीन ओवेसी (Akbaruddin Owaisi) यांनी आज औरंगाबादमधील सभेत मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर जोरदार टीका केली. आपला राज्यात एक तरी खासदार आहे का? तुम्हाला घरातून काढलंय अशा शब्दांत MIM नेते अकबरुद्दीन ओवेसींनी राज ठाकरेंवर टीका केलीये.
यावेळी ओवेसींची जीभ घसरली. कुत्रा भुंकतोय, भुंकू दे असे शब्द वापरत त्यांनी टीकेची झोड उठवलीये. लवकरच मोठी सभा घेऊन उत्तर देऊ, असंही ओवेसींनी म्हटलं आहे. मी कुणाल उत्तर द्यायला आलेलो नाही, माझा तरी एक खासदार आहे तू तर बेघर आहे, तुला घरातून काढलेलं आहे, अशा शब्दात अकबरुद्दीन ओवेसी यांनी राज ठाकरे यांचं नाव न घेता डिवचलं.
लवकरच मोठी सभा घेऊन चांगलं उत्तर देऊ, जागा, वेळ मी ठरवेल आणि तुला उत्तर देईल असं अकबरुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे. आज देशात विष पेरलं जातं आहे, हिजाब बद्दल बोलताय मात्र आम्ही प्रेमाने उत्तर देऊ, आपल्याला घाबरायची गरज नाही, काय बोलायचं ते बोलू द्या असंही अकबरुद्दीन ओवेसी यांनी आपल्या भाषणात सांगितलं.
औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन
त्याआधी एमआयएमचे नेते अकबरुद्दीन ओवेसींनी खुलताबादमध्ये जाऊन औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतल्यामुळे वाद निर्माण झालाय. आजच्या सभेपूर्वी अकबरुद्दीन यांनी वेगवेगळ्या दर्ग्यांना भेटी दिल्या. त्याचाच भाग म्हणून त्यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं. त्यानंतर नव्या वादाला सुरुवात झालीय. औरंगाबादमधल्या शिवसैनिकांनी यावर जोरदार टीका केलीय.