अकोल्यात नवीच दहशतः अवघड जागेच्या दुखण्यावर उपचार करणारा डॉक्टर निघाला फेक

Akola Crime :  अकोल्यात नॅचरोपॅथी व योगाचे प्रमाणपत्र असलेल्या डॉक्टरवर मूळव्याधीवर उपचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुग्णाच्या तक्रारीवरुन पोलिसांनी या डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आकाश नेटके | Updated: Dec 8, 2023, 02:23 PM IST
अकोल्यात नवीच दहशतः अवघड जागेच्या दुखण्यावर उपचार करणारा डॉक्टर निघाला फेक title=

Akola Crime : अकोल्याच्या वैद्यकीय क्षेत्रात एका बंगाली डॉक्टरमुळे खळबळ उडाली आहे. नॅचरोपॅथी व योगाचे प्रमाणपत्र असलेल्या एका डॉक्टरने रुग्णांवर मुळव्याधाचे उपचार केल्याचे समोर आलं आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हा डॉक्टर सर्रासपणे मुळव्याध्यीच्या रुग्णांना औषधे देऊन त्यांच्यावर उपचार करत होता. मात्र एका पीडित व्यक्तीने तक्रार केल्यानंतर हा सगळा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

अकोल्यामध्ये या डॉक्टरने कोणताही अभ्यास नसताना मुळव्याधीवर औषधे देऊन रुग्णांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय. या डॉक्टरविरुद्ध वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे एका रुग्णाने तक्रार केल्यानंतर त्यांनी यासंदर्भात बोरगांव मंजू पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे परवानगी नसतानाही हा डॉक्टर रुग्णांवर अँलोपॅथीची प्रॅक्टीस करत होता. डॉ. एस.एस. बॅनर्जी उर्फ प्रोबीर संतोष सरकार असं या डॉक्टरचे नाव असून तो मुळचा पश्चिम बंगालचा आहे.

आरोपी प्रोबीर संतोष सरकार हा गेल्या 15 वर्षापासून बोरगाव मंजू येथे रुग्णांवर उपचार करत होता. अकोल्याच्या धोतर्डी येथील एका रुग्णाला मूळव्याधीचा त्रास होत होता. त्याच्या मूळव्याधीच्या त्रासावर प्रोबीर संतोष सरकारने आपण उपचार करु असे सांगितले आणि रुग्णाकडून त्याने 35 हजार रुपये घेतले. सरकारने या रुग्णाला मूळव्याधीच्या त्रासावर काही औषधे दिली होती. मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. रुग्णाला त्रास सुरुच होता. त्यामुळे रुग्णाने सरकारकडे जाऊन पैसे परत मागितले. मात्र त्याने पैसे परत देण्यास नकार दिला. डॉक्टर सरकारवर संशय आल्याने रुग्णाने त्याची तक्रार तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे केली.

तालुका वैद्यकीय अधिकाऱ्याने रुग्णाच्या तक्रारीवरून या सगळ्या प्रकरणाची चौकशी वैद्यकीय अधिकारी डॉ. रूपाली पवार यांच्याकडे सोपवली. डॉ. रूपाली पवार यांनी आरोपी प्रोबीर संतोष सरकार याच्या दवाखान्यावर जाऊन पाहणी केली असता त्याने 35 हजारांमध्ये मूळव्याधावर औषध देतो असे सांगितल्याचे समोर आले. सरकारच्या दवाखान्यात वैद्यकीय अधिकाऱ्यांना काही औषधे सापडली. तसेच आरोपी सरकार दवाखान्यात हा नॅचरोपॅथीक व योगाचे तो प्रमाणपत्र असतांना अॅलोपॅथीची प्रॅक्टीस करताना दिसून आला. 

दरम्यान, तपासानंतर डॉ. रूपाली पवार तोतया डॉ. एस.एस. बॅनर्जी उर्फ प्रोबीर संतोष सरकार याच्याविरूद्ध बोरगाव मंजू पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीविरुद्ध कलम 33 महाराष्ट्र वैद्यकिय व्यवसायी अधिनियम 1961 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.