रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा आकडा वाढत आहे. आणखी एकाचा कोरोनाचा रिपोर्ट हा पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाच झाली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे दोन दिवसांपूर्वी साखरतर या गावातील जी महिला कोरोनाबाधित आढळून आली होती, त्याच महिलेच्या जावेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे साखरतर येथे चिंता वाढली आहे. या दोन्ही महिला कोणाच्या संपर्कात आल्यात याचा आता शोध घेण्यात येत आहे. दरम्यान, खेड येथे दुबईतून आलेल्या व्यक्तीचा दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. ही व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे चाचणीनंतर स्पष्ट झाले होते. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा एक बळी गेला आहे. कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली होती.
BreakingNews । रत्नागिरीत कोरोनाचा आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह । जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या पाच वर । साखरतर येथील कोरोनाबाधित महिलेच्या जावेला कोरोनाची लागण । १७ पैकी १५ जणांचे रिपोर्ट आले, एक रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह#Coronavirus #CoronaFighters #COVID19 @ashish_jadhao pic.twitter.com/V1EtmKYjZ3
— ZEE २४ तास (@zee24taasnews) April 10, 2020
साखरत येथील संबंधित महिलेच्या घरातील १४ जणांचे रिपोर्ट हे तपासणीकरिता पाठवण्यात आले होते. पैकी एकाचा रिपोर्ट हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, साखरतर या गावातील महिला कोरोनाबाधित आल्यानंतर आता गावचा परिसर हा तीन किमीपर्यंत सील करण्यात आला आहे.
दरम्यान, सध्याच्या घडीला सर्व कोरोनाबाधितांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु आहेत. पहिल्या कोरोनाबाधिला डिस्चार्ज दिल्याची बातमी जिल्ह्याकरिता आनंदाची असताना आता आणखी एक कोरोनाचा रुग्ण आढळून आल्याने ही बाब आरोग्य यंत्रणा आणि रत्नागिरीकराची चिंता वाढवणारी अशीच आहे. दरम्यान, या साऱ्या परिस्थितीमध्ये नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून केले जात आहे. तसेच कोणीही घराबाहेर पडू नका, घरीच राहण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.