जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : मे महिन्याच्या सुरवातीपासूनच कडाक्याचे उन पडू लागले आहे. दुसरीकडे नागपूर विभागातील धरणे कोरडी पडू लागल्याने येत्या काळात पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. ज्यामुळे जिल्हा प्रशासनाने जपून पाणी वापरण्याचे आवाहन नागरिकांना केलं आहे.
पाण्यासाठी टँकर भोवती नागरिकांची गर्दी वाढत चालली आहे. ग्रामीण भागात नाही तर शहरी भागात ही परिस्थिती आहे. एप्रिल महिन्यापर्यंत व्यवस्थित होणारा पाणीपुरवठा आता बाधित झाला आहे. त्यामुळे कुठे एक दिवस तर कुठे दोन दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. जिथे नळाची पाईप लाईन नाही तिथे तर नागरिकांना टँकरवरच अवलंबून राहवे लागत आहे. त्यामुळे शहरातील अनेक वस्त्यांमध्ये पाण्यासाठी टँकरचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे.
पाण्याच्या कमतरतेमुळे नागरिकही पाण्याचा काटकसरीने वापर करीत असल्याचे सांगतात. भीषण उन्हाळ्यात उष्णेतपासून बचावासाठी कुलरचा वापर देखील जपून करीत असल्याचं नागरिक सांगत आहेत.
नागपूर जिल्ह्याला पाणी पुरवठा करणाऱ्या तोतलाडोह, नवेगाव खैरी आणि खिंडसी या धरणांमध्ये फक्त ०.६७ दशलक्ष घनमीटर एवढे पाणी शिल्लक आहे. नागपूरची रोजची पाण्याची गरज १ पूर्णांक ३ दशलक्ष घनमीटर आहे. एवढी पाण्याची गरज लक्षात घेता हे पाणी १० जून पर्यंत पुरेल अशी माहिती नागपूरचे जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांनी दिली आहे. मात्र, उन्हाळ्यात धरणांमधून वाढते वाष्पीभवन पाहता हे पाणी २० मेच्या जवळपास संपण्याची चिन्हे असल्याने नागपुरात पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
जिल्हा प्रशासनाने नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे अत्यंत काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. पिण्याच्या पाण्याचा इतर कोणत्याही दुसऱ्या कामात वापर करणे टाळावे. गाड्या धुणे, बाग कामात पाण्याचा वापर करणे टाळावे असे जिल्हा प्रशासनाने म्हटलं आहे.
दरम्यान, नागपूरला पाणीपुरवठा करणाऱ्या ओसीडब्ल्यू ( ऑरेंज सिटी वॉटर वर्क्स ) या कंपनीने भर उन्हाळ्यात अनेक ठिकाणी दुरुस्तीचे काम सुरु केल्याने अनेक वस्त्यांमध्ये पाणी पुरवठा बाधित झाला आहे. महापालिकेकडून अशा सर्व वस्त्यांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. नागपूर शहराच्या अनेक वस्त्यांमध्ये महापालिकेची किंवा ओसीडब्ल्यूची नळ योजना न पोहोचल्यामुळे त्या वस्त्यांमध्ये ही गेले अनेक महिन्यांपासून टँकर ने पाणी पुरवठा करावा लागत आहे. पाण्याच्या टंचाईचे परिणाम अशा सर्व वस्त्यांमध्ये दिसून येत असून नागरिकांना भीषण उन्हाळ्यात पाण्याच्या कमतरतेमुळे अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे.