अर्णब गोस्वामींना न्यायालयाने चांगलेच खडसावले

अर्णब गोस्वामी यांना अलिबाग येथील न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र सुनावणी सुरू असताना अर्णब यांनी आपला फोन सुरूच ठेवला. त्यामुळे न्यायालयाने त्यांना खडसावले  

Updated: Nov 4, 2020, 10:15 PM IST
अर्णब गोस्वामींना न्यायालयाने चांगलेच खडसावले title=

मुंबई : अर्णब गोस्वामी यांना अलिबाग येथील न्यायालयात हजर करण्यात आले. मात्र सुनावणी सुरू असताना अर्णब यांनी आपला फोन सुरूच ठेवला. त्यामुळे न्यायालयाने त्यांना खडसावले आणि फोन बंद करण्याचे निर्देश दिले. यावेळी अर्णब गोस्वामींनी पोलिसांनी मारहाण केल्याचा आरोप केला. त्यामुळे न्यायालयाने त्यांची पुन्हा वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार त्यांना पुन्हा पोलीस ठाण्यात नेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. मात्र, त्यांना मारहाण झाल्याचा दावा न्यायालयाने फेटाळून लावला आहे.

अन्वय नाईक यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहीली होती. त्या चिठ्ठीत रिपब्लिकचे अर्णब गोस्वामी, स्काय मीडियाचे फिरोज शेख आणि स्मार्ट वर्क्स कंपनीचे नितेश सरजा यांच्यामुळे आत्महत्या करत असल्याचं नमूद केले होते. दरम्यान अन्वय नाईक आत्महत्याप्रकरणी त्यांच्या पत्नीने ऑगस्ट महिन्यात एका व्हिडिओद्वारे अर्णब गोस्वामीविरोधात तक्रार केली होती. कारवाई होत नसल्याची, न्याय मिळत नसल्याची तक्रार या व्हिडिओतून त्यांनी केली होती.

रिपब्लिक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी अन्वय नाईकांना आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप नाईक यांच्या कुटुंबीयांनी केला. आज पत्रकार परिषद घेऊन अर्णब गोस्वामी यांनी सुडबुद्धीनं कामाचे पैसे दिले नसल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. तसंच अर्णब यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा हल्लाबोलही नाईक कुटुंबानं केला. त्यामुळे आता तरी अन्वय नाईकांना न्याय मिळणार का असा सवाल उपस्थित होतोय. 

कायद्यापेक्षा कोणी मोठे नाही, अशी प्रतिक्रीया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. ही केस बंद झाली होती. पण मिसेस नाईक यांनी न्यायालयात अर्ज केला आणि न्यायालयाने केस ओपन करण्याची परवानगी दिली, असे देशमुख यांनी सांगितले.