ठाणे : देशातीलच नव्हे तर आशिया खंडातील (Asia) सर्वात मोठ्या, महत्वाकांक्षी आणि ऐतिहासिक समुह विकास योजना (Cluster Development Plan) सत्यात उतरणार असून असून या महत्वपूर्ण प्रकल्पाचा शुभारंभ सोहळा येत्या सोमवारी म्हणजे 5 जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे
ठाणे शहरात मोडकळीस आलेल्या धोकादायक अनधिकृत आणि अधिकृत इमारतींचा सुनियोजित तसंच संपूर्ण नागरी पायाभूत सुविधांसह पुनर्विकास व्हावा यासाठी एकूण 45 नागरी पुनरुत्थान आराखडे (Recovery Plans) तयार करण्यात आले असून त्याचं एकूण क्षेत्रफळ 1500 हेक्टर इतकं आहे. या 45 आराखड्यापैंकी अत्यंत दाटीवाटीचं क्षेत्र असलेल्या किसननगर नागरी पुर्नरुत्थान आराखडा क्र. 12 मधील नागरी पुर्नरुत्थान योजना क्र. 1 आणि 2 च्या कामाचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे
अनधिकृत तसंच अधिकृत धोकादायक इमारतीचा सामूहिक पुर्नविकास करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून नियमावली तयार करण्यात आली आहे. या योजनेच्या कामाची सुरूवात अंतिम भूखंड क्र. 186/187 या वरील 7753 चौ.मी क्षेत्रफळावरील भूखंडावर त्याचप्रमाणे रस्ता क्रमांक 22 लगतचा भूखंड क्रमांक एफ - 3 या ठिकाणी 19275 चौ.मी. एवढया जागेवर करण्यात येणार आहे. नागरी पुनरुत्थान 1 व 2 ची अंमलबजावणी सिडको या शासनाच्या कंपनीमार्फत होणार आहे. त्याचप्रमाणे समूह विकास योजनेचं कामकाज सांभाळण्यासाठी कशिश पार्क इथं क्लस्टर पुनर्विकासचे कार्यालय निर्माण करण्यात आलं आहे. या प्रशस्त कार्यालयाचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
अनधिकृत इमारतीसह वसाहतीचा टाऊनशीप धर्तीवर एकत्रित पुनर्विकासाचा प्रकल्प, मोडकळीस आलेल्या घरातून थेट सुरक्षित आणि सुनियोजित संकुलामध्ये घर, पात्र निवासी लाभधारकास विनामूल्य 323 चौ. फूट मालकी हक्काचं घर, प्रत्येक सेक्टरमध्ये सण, उत्सव, धार्मिक कार्यक्रम सामाजिक उपक्रमांसाठी विशेष जागा, प्रत्येक सेक्टरमध्ये वाचनालय, व्यायामशाळा, आरोग्यकेंद्र आणि कम्युनिटी सेंटरची व्यवस्था, पाळणाघरासह महिला सक्षमीकरण केंद्र आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, अरुंद रस्ते आणि गजबजलेल्या गल्लीऐवजी प्रशस्त तसंच दर्जेदार रस्ते आणि वाहतूक सुविधा, पाणीपुरवठा, मल व जलनिःस्सारण, घनकचरा व्यवस्थापनासह पायाभूत सुविधा, पुनर्विकसित टाऊनशीप आराखड्यामध्ये सुसज्ज आरोग्य, शैक्षणिक, क्रीडा, मनोरंजन, उद्यान पार्किंग, मंडई आदी नागरी सुविधांचा समावेश या योजनेत आहे. प्रख्यात वास्तुविशारद हाफिज कॉन्ट्रॅक्टर यांच्या डिझाईननुसार टाऊनशीपची उभारणी केली जाणार आहे
या प्रकल्पाच्या निमित्ताने आशियातील सर्वात मोठ्या असणाऱ्या योजनेचा शुभारंभ होत आहे. अनेक वर्षे नागरिक प्रतीक्षा करीत असलेल्या क्लस्टर योजनेचा प्रत्यक्ष शुभारंभ होत असल्याने अधिकृत तसंच मालकी हक्काच्या घरात राहण्याचं नागरिकांचे स्वप्न लवकरच साकार होणार आहे.
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
क्लस्टर योजना सत्यात उतरणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला आहे. 'क्लस्टर योजना हे आपल्या आयुष्यातील एक ध्येय होतं. यासाठी मी खूप मोठा संघर्ष केलेला आहे. मी मुख्यमंत्री असतांना माझं हे स्वप्न प्रत्यक्षात येत असल्याचा आनंद असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. ठाण्यात क्लस्टर योजनेचा आरंभ ही एक नवी सुरुवात आहे. कोणालाही घरातून बाहेर काढलं जाणार नसून अतिशय नियोजनबद्ध रीतीने क्लस्टर योजना राबविण्यात येणार आहे. फक्त घरे बांधणे उद्दिष्टे नसून सोयी सुविधांयुक्त अशी टाउनशीप बसवण्याचा हा प्रकल्प असून आशिया खंडातील सर्वात मोठा आणि महत्वाचा प्रकल्पाने निश्चितच सर्वांना न्याय मिळेल कोणालाही नाराज होण्याचा प्रश्न नाही असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलाय.