दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई : येत्या दोन-तीन दिवसात राज्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. तसेच २० सप्टेंबरनंतर केव्हाही राज्यातील निवडणुकीची तारीख जाहीर होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभुमीवर विधानसभा निवडणूक राज्यात किती टप्प्यात होणार याची चर्चा आहे. २००४, २००९ आणि २०१४ ची विधानसभा निवडणूक एका टप्प्यातच पार पडली होती. मात्र नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात चार टप्प्यात मतदान झालं होतं. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीत किती टप्प्यात मतदान होणार याबाबत चर्चा सुरु आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत देशात नऊ आणि राज्यात चार टप्प्यात मतदान पार पडलं होतं. सत्ताधारी पक्षाला प्रचारासाठी वेळ मिळावा म्हणून एवढ्या टप्प्यात मतदान घेतल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. विधानसभा निवडणुकीतही राजकीय पक्षांना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचता यावं यासाठी एका पेक्षा जास्त टप्प्यात राज्यात मतदान होणार का ? याबाबत उत्सुकता आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथकही राज्याच्या दौऱ्यावर असून आज मुंबईत विविध घटकांशी निवडणूक आयोगाच्या प्रतिनिधींची दिवसभर बैठकही आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक, राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींबरोबर बैठक घेऊन निवडणूक आयोग राज्यातील निवडणुकीची तयारी आणि कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीचा आढावा घेत आहे. यात राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगाकडे विविध मागण्या केल्या आहेत.
२० सप्टेंबरनंतर केव्हाही केंद्रीय निवडणूक आयोग दिल्लीत राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करू शकते. २५ ऑक्टोबरपासून दिवाळी असल्याने त्याआधीच राज्यात मतदान आणि मतमोजणी पूर्ण होईल अशी शक्यता आहे. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीची तारीख १२ सप्टेंबर रोजीच जाहीर झाली होती. तर १५ ऑक्टोबर रोजी मतदान आणि १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी झाली होती. २०१४ च्या तुलनेत यावेळी एक आठवड्यापेक्षा जास्त काळ उलटून गेला तरी निवडणुकीची तारीख जाहीर झालेली नाही.