भाजपाकडून औसामधून पवारांना संधी, मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न

गेल्या सहा विधानसभांपासून औसा विधानसभेतून शिवसेनेचा उमेदवार असतो पण यंदा मात्र ही जागा भाजपानं आपल्या ताब्यात घेतलीय

Updated: Oct 1, 2019, 03:53 PM IST
भाजपाकडून औसामधून पवारांना संधी, मुख्यमंत्र्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न  title=

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक (पीए) असलेले अभिमन्यू पवार यांना भाजपकडून लातूर जिल्ह्यातील औसा मतदारसंघातून निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलं गेलंय. गेली सहा विधानसभा निवडणुकांत शिवसेनेकडे असलेल्या या जागेवर भाजपने दावा केलाय... ते केवळ मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकासाठी... ज्या काही जागांच्या वादामुळे युतीच्या घोषणा लांबली त्यापैंकी औसा हा मतदारसंघ असल्याचंही म्हटलं जातंय.  

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी राज्यातील मंत्री, सत्ताधारी-विरोधी पक्ष नेते, अधिकारी हे ज्यांच्याकडे विनंती करून वेळ मागत असतात ते मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायकच निवडणुकीच्या आखाड्यात उतरत आहेत... अभिमन्यू पवार हे गेल्या पाच वर्षांपासून मुख्यमंत्र्यांचे खाजगी स्वीय सहायक म्हणून काम पाहत आहेत. 

अभिमन्यू पवार हे मूळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक, त्यानंतर भाजपचे भाजपचे कार्यकर्ते... लातूर जिल्ह्यात भाजयुमोच्या माध्यमातून त्यांनी पक्षाचं काम केलंय. २०१४ च्या निवडणुकीत भाजप नेते ओम माथूर-देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम केलं. पुढे भाजपची सत्ता आली आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरूनच आपण मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक झाल्याचे अभिमन्यू पवार सांगतात. 

मूळ भाजपचा कार्यकर्ता असल्यामुळे सामान्य कार्यकर्त्याला वाटतं त्याप्रमाणे आपल्यालाही आमदार व्हावं वाटलं. मनातील इच्छा मुख्यमंत्र्यांमुळे जवळ बोललो आणि साहेबांनी कामाला लागण्याचे आदेश दिल्यामुळे लातूर जिल्ह्यातील औसा येथून आपण तयारीला लागल्याचं अभिमन्यू पवार सांगतात.

गेल्या सहा विधानसभांपासून औसा विधानसभेतून शिवसेनेचा उमेदवार असतो. दिनकर माने यांच्या रूपाने औसाने दोनदा शिवसेनेचा आमदार निवडून दिलाय. मात्र गेल्या दोन विधानसभा निवडणुकांत ते सलग दोनदा पराभूत झाले. त्यामुळे आता भाकरी फिरवावी लागेल, असे म्हणत अभिमन्यू पवार यांनी औसावर भाजपचा दावा सांगितला आणि आता ही संधी त्यांच्या हातातही पडलीय.

औसा हे पूर्वीपासून भाजपची ताकद असलेला तालुका असल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांचे स्वप्न साकारण्यासाठी आपण इथून उमेदवारी मागितल्याचे ते सांगतात. 

महाराष्ट्रातील ज्या पाच वादग्रस्त जागांमुळे युतीच्या घोषणेला उशीर झाला त्यापैंकी एक औसाची जागा असल्याचं म्हटलं जातंय. खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनीच अभिमन्यू पवार यांच्यासाठी युतीवरच एक प्रकार टांगती तलवार ठेवल्याच्याही चर्चा रंगल्या. अभिमन्यू पवार यांच्याशिवाय भाजप नेते तथा लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे बंधू अरविंद पाटील निलंगेकर, जिल्हा परिषदेचे सभापती बजरंग जाधव हेही या जागेसाठी भाजपकडून इच्छुक होते. सीएमचे पीए असलेल्या अभिमन्यू पवार यांना संधी मिळाल्यानं त्यांचा मात्र हिरमोड झालाय. 

अभिमन्यू पवार यांची लढत होणार आहे सलग दोन वेळेस औसा येथून काँग्रेसकडून निवडणूक लढविणारे काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांच्यासोबत... त्यामुळे एक अनुभवी आमदार विरुद्ध भाजपचे संभाव्य नवखे उमेदवार असलेल्या अभिमन्यू पवार यांच्या लढतीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.