मुंबई : शनिवारी निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्र आणि हरियाणा राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. एकिकडे निवडणूक आयोगाच्या वतीने या महत्त्वाच्या घोषणा केल्या जात असतानाच देशातील राजकीय पटलावर मोठ्या हालचाली आणि प्रतिक्रियांची लाट उसळल्याचं पाहायला मिळालं.
आयोगाकडून जाहीर करण्यात आलेल्या मतदानाच्या तारखा आणि त्यानंतर होणारी मतमोजणी या दिवसांमध्ये तीन दिवसांचं अंतर असल्यामुळे याविषयी आपली पहिली प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेस नेते छगन भुजबळ यांनी काही प्रश्न आणि त्यांच्या मनातील शंका उपस्थित केल्या.
'एकाच टप्प्यात महाराष्ट्रात निवडणुका होत आहेत. त्यामुळे मग मुद्दा असा आहे की, २१ ऑक्टोबरला मतदान होत असेल तर मग २२ तारखेलाच मतमोजणी का घेण्यात येणार नाही?', अशा शब्दांत भुजबळ यांची त्यांच्या मनातील शंका व्यक्त केली. दोन दिवस ते का थांबत आहेत, असा प्रश्नार्थक सूर आळवत त्यांनी ईव्हीएममध्ये पुन्हा एकदा गडबड केली जाणार का? या अशा शंकांना वाव मिळत असल्याचं स्पष्ट केलं.
'झी २४ तास'शी संवाद साधताना भुजबळ यांनी येत्या काळात ते निवडणूकांसाठीची त्यांची भूमिका कशी असेल याविषयी बोलताना दिसले. पण, पक्षांतराविषयी मात्र त्यांनी स्पष्ट उत्तर देणं टाळलं. त्यामुळे त्यांच्या मनात नेमकं काय दडलं आहे हे अद्यापही उघड झालेलं नाही. तूर्तास येत्या काळात निवडणूक लढवण्याचा विचार असल्याचं म्हणत तेही राष्ट्रवादीच्याच चिन्हावर या भूमिकेवर ते ठाम असल्याचं कळत आहे.
कधी आहेत निवडणुका?
२१ ऑक्टोबरला एकाच टप्प्यात महाराष्ट्रात मतदान होणार आहे. तर, २४ ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. २७ सप्टेंबरला निवडणुकांची अधिसूचना जाहीर होणार आहे. तर ४ ऑक्टोबरपर्यंत उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत असणार आहे. ५ ऑक्टोबरला या अर्जांची छाननी होणार आहे. या निवडणुकीसाठी महाराष्ट्रात १.८ लाख ईव्हीएमचा वापर करण्यात येणार आहे.