लातूर ग्रामीण भाजपात बंडखोरी, रमेश कराडांची अपक्ष उमेदवारी

लातूर जिल्ह्यात भाजपला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. 

Updated: Oct 7, 2019, 04:26 PM IST
लातूर ग्रामीण भाजपात बंडखोरी, रमेश कराडांची अपक्ष उमेदवारी title=

शशिकांत पाटील, झी मीडिया, लातूर : लातूर जिल्ह्यात भाजपला बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. अहमदपूर येथील भाजप नेते दिलीप देशमुख, अहिल्या केंद्रे यांच्या बंडखोरीनंतर लातूर ग्रामीण मधील भाजप नेते रमेश कराड यांनीही बंडखोरी केली आहे. लातूर ग्रामीण हा भाजपच्या ताब्यातील मतदारसंघ होता. मात्र तो न मागताही यावेळेस शिवसेनेला सोडण्यात आला. त्यामुळे नाराज झालेले पंकजा मुंडे समर्थक रमेशप्पा कराड हे आता अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूकीच्या आखाड्यात उतरले आहेत. 

२००९ आणि २०१४ च्या विधानसभेत रमेश कराड हे भाजपच्या तिकिटावर याच मतदारसंघातून निवडणूक लढले होते. मात्र त्यात ते काँग्रेस उमेदवाराकडून पराभूत झाले होते. गेल्यावर्षी विधान परिषदेच्या लातूर-बीड-उस्मानाबाद मतदारसंघ निवडणुकीत रमेशप्पा कराड हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर उभे राहणार होते. त्यावेळी नाट्यमय घडामोडी घडल्यानंतर रमेशअप्पा कराड यांनी निवडणुकीतून माघार घेत पुन्हा भाजपमध्ये येऊन स्थिरावले होते. 

आता विधानसभेच्या आखाड्यात लातूर ग्रामीण मतदारसंघातून कराड यांनी पूर्ण तयारी केली होती. पण न मागताही युतीमध्ये लातूर ग्रामीण मतदारसंघ शिवसेनेला देण्यात आला. याचा जबर धक्का रमेश कराड यांच्यासहित त्यांच्या कार्यकर्त्यानाही बसला. भाजपने ही जागा ताब्यात घेऊन रमेश कराड यांना उमेदवारी द्यावी असे साकडे त्यांच्या समर्थकांनी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरी जाऊन घातले होते. 

तर रेणापूर येथील पिंपळफाटा इथेही कराड समर्थकांनी तिकीट न मिळाल्यामुळे रास्ता रोको आंदोलन केले. मात्र याबाबत काहीही निर्णय न झाल्यामुळे कार्यकर्ता मेळावा घेऊन अपक्ष म्हणून आपण निवडणूक लढवू असे त्यांनी जाहीर केलं आहे. त्यांची लढत ही काँग्रेसचे धीरज विलासराव देशमुख यांच्या बरोबर होणार आहे.