विधानसभा निवडणूक २०१९: पुण्याचा बालेकिल्ला कोण जिंकणार?

पुण्यात यंदा कोण मारणार बाजी...

Updated: Sep 16, 2019, 05:34 PM IST
विधानसभा निवडणूक २०१९: पुण्याचा बालेकिल्ला कोण जिंकणार? title=

अरुण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : विजयाची घौडदौड कायम ठेवत गेल्या वेळच्या यशाची पुनरावृत्ती करण्यासाठी भारतीय जनता पक्ष पुण्यामध्ये सज्ज आहे. तर विधानसभेच्या निवडणुकीत भोपळा फोडण्याचं आव्हान काँग्रेस आघाडीसमोर आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळेच पक्ष आता कामाला लागले आहे. पुणे म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा बालेकिल्ला. पण या गोष्टी आता इतिहासजमा झाल्या आहेत. कारण पुण्यनगरी सध्या भाजपनगरी झाली आहे. 

२०१४ सालच्या मोदी लाटेत भाजपाचे अनिल शिरोळे तब्बल ३ लाखांच्या मताधिक्यानं खासदार झाले. विधानसभा निवडणुकीत पुण्यातील आठही मतदारसंघात भाजपाचे शिलेदार विजयी झाले. काँग्रेस, राष्ट्रवादीसह शिवसेनेचा सुपडा साफ झाला. २०१७ च्या महापालिका निवडणुकीतही विरोधकांची अक्षरशः धूळधाण झाली. पुणे महापालिकेवर भाजपाचा झेंडा फडकला. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या गिरीश बापटांनी विक्रमी मताधिक्यानं विजय मिळवला. 

एकेकाळी पुण्याची सूत्रं काँग्रेसचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हातात होती. नंतर शरद पवार आणि अजित पवार पुण्याचे कारभारी झाले. पण आता पुणेकरांनी त्यांना अलगद बाजूला सारलं आहे. आता विधानसभा निवडणुकीतही पुण्यात भाजपचीच हवा दिसते आहे.

मेट्रो प्रकल्प, पीएमआरडीएची स्थापना, स्मार्ट सिटी, नदीसुधार प्रकल्प, अखंड पाणीपुरवठा योजना, झोपडपट्टी पुनर्वसन, आंतरराष्ट्रीय विमानतळ अशी अनेक विकासकामं सरकारनं मार्गी लावल्याचा दावा भाजपातर्फे करण्यात येतो. विरोधकांना मात्र तो मान्य नाही. शहरातील बेरोजगारी, वाहतुकीचा प्रश्न, पाणी प्रश्न, प्रदूषण, वाढती गुन्हेगारी, बंद पडणारे कारखाने तसेच सत्ताधाऱ्यांकडून सुरु असलेला भ्रष्टाचार अशा कारणांमुळे जनता भाजप- सेनेच्या उमेदवारांना घरी बसवणार असल्याचा काँग्रेस - राह्ष्ट्रवादीला विश्वास आहे. 

पुण्यामध्ये पर्वतीतून माधुरी मिसाळ, कसब्यातून गिरीश बापट, कॅंटोन्मेंटमधून दिलीप कांबळे, वडगाव शेरीतून जगदीश मुळीक, शिवाजीनगरमधून विजय काळे, कोथरुडमधून मेधा कुलकर्णी, हडपसरमधून योगेश टिळेकर तसेच खडकवासल्यातून भीमराव तापकीर हे विद्यमान आमदार आहेत. यापैकी गिरीश बापट खासदार बनून दिल्लीत गेलेत. शहरातील इच्छूकांची संख्या लक्षात घेता यावेळी सगळ्यांनाच पुन्हा संधी मिळेल की नाही याबाबत साशंकता आहे. 

शिवसेनेसोबत युती झाल्यास एखाद दुसऱ्याला पक्षासाठी त्यागही करावा लागू शकतो. याशिवाय बदलत्या राजकीय समीकरणांवर बरंच काही अवलंबून आहे. दुसऱ्या बाजूला काँग्रेस - राष्ट्रवादीची ताकदच मुळात क्षीण झालेली आहे. त्यात त्यांच्याकडे अपवाद वगळता सक्षम उमेदवाराची वानवा आहे. अशा परिस्थितीत २०१९ ची दिवाळी कुणासाठी गोड आणि कुणासाठी कडू ठरणार याबद्दल उत्सुकता आहे.