चंद्रपूर : येथील राजुरा येथे अल्पवयीन आदिवासी मुलींवर अत्याचार करण्यात आल्याने संताप व्यक्त होत आहे. इन्फन्ट जीजस शाळेच्या वसतिगृहातील धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. काँग्रेस जिल्हाध्यक्ष माजी आमदार सुभाष धोटे यांची संस्था ही संस्था असल्याचे पुढे आले आहे. आतापर्यंत ४ मुलींच्या पालकांनी तक्रार नोंदवली आहे. महिला आणि आदिवासी संघटनानी तीव्र आंदोलन करण्यात येत आहे. हा प्रकार घडूनही पोलीस यंत्रणा आणि प्रशासनाने मौन बाळगल्याने चीड व्यक्त होत आहे.
शाळेच्या वसतिगृहात अल्पवयीन आदिवासी मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने जिल्हा हादरला आहे. गेली काही वर्षे हा प्रकार सातत्याने सुरु असल्याचे उघड झाले असून गुंगीचे औषध देत अल्पवयीन मुलींवर अत्याचार केला जात असल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. आतपर्यंत ४ मुलींच्या पालकांनी पोलिंसात तक्रार दाखल केली आहे. मात्र पोलीस आणि प्रशासन यावर कॅमेऱ्यासमोर बोलण्यास तयार नाहीत.
चुनाभट्टी वॉर्डात इन्फन्ट जीजस शाळा आणि त्याचे वसतिगृह आहे. दहावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या या संस्थेत १५० मुली आणि १५० मुले आहेत. नागपूर उपविभागातील नामांकित दर्जा असलेली ही शाळा आणि वसतिगृह गेले ४ दिवस अचानक चर्चेत आले आहे. शाळेत बहुतांश आदिवासी विद्यार्थी आहेत. ५ एप्रिल रोजी या शाळेतील ८ आणि ९ वर्ष वयाच्या २ विद्यार्थिनी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाल्या. पोटात दुखणे, चक्कर येणे यासह गुंगीचा ओव्हरडोज अशी लक्षणे या विद्यार्थिनीत आढळली.
अधिक सखोल वैद्यकीय तपासात मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचे उघड झाले. १३ एप्रिल रोजी माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी 'मर्दानी महिला मंच' च्या कार्यकर्त्यांसमवेत जिल्हा रुग्णालय गाठले. मुलींशी संवाद साधला. मात्र मुली दबावात असल्याचे त्यांना जाणवले. पोलीस अधीक्षकांशी चर्चा केल्यावर त्यांनी सखोल चौकशी मागणी केली. त्यानुसार तपासाची चक्रे फिरली. पोलिसांच्या विविध तथके शाळा , वसतिगृह, अन्य विद्यार्थिनी, कर्मचारी यांची चौकशी करू लागल्या. दरम्यान वसतिगृहाच्या झडतीत अनेक आक्षेपार्ह वस्तू आढळल्या. राजुरा पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी वसतिगृह अधीक्षकाला ताब्यात घेत चौकशी सुरु केली. आता महिला संघटनांनी प्रकरणात कठोर कारवाईची मागणी केली.
माजी आमदार सुभाष धोटे यांची ही शाला आहे. हे प्रकरण उजेडात आल्यावर आम्ही लोकसभा निवडणुकीत व्यस्त होतो. या प्रकाराबाबत आपल्याला कल्पना नाही. या प्रकरणात संबंधित यंत्रणांनी चौकशी करावी आम्ही चौकशीला तयार आहोत, अशी भूमिका शाळा प्रशासनाने घेतली आहे.
शाळेतील २० हुन अधिक अल्पवयीन मुलींना गुंगीचे औषध देत त्यांच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यावर तपास करण्यात येत आहे. शाळेतील विद्यार्थिनीच्या पालकांनी धाडसाने पुढे येत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. दरम्यान चिमुकल्या आदिवासी मुलींसोबत झालेल्या या संतापजनक लैगिक अत्याचाराचे पडसाद जिल्ह्यात उमटू लागले आहेत. जिल्ह्यातील महिला आणि आदिवासी संघटना आक्रमक पवित्र्यात आहेत. राजुरा तालुक्याच्या आंतरराज्य सीमेवर लक्कडकोट येथे चक्का जाम आंदोलन करून आदिवासी कार्यकर्त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी आणि दोषींवर कारवाईची मागणी केली आहे.
या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांना चौकशीचे आदेश देत दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.