भंगार विकता विकता झाला 'बाबा', झटपट पैशांसाठी भोंदूगिरी भोवली...

भंगारवाल्या भोंदूबाबाचं झी 24 तासकडून पितळ उघडं...पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Updated: Aug 21, 2021, 08:51 PM IST
भंगार विकता विकता झाला 'बाबा', झटपट पैशांसाठी भोंदूगिरी भोवली... title=
विशाल करोळे, झी मीडिया औरंगाबाद:  झी 24 तास ने पर्दाफाश केलेल्या औरंगाबादच्या भोंदू बाबांचे अनेक रंजक किस्से पुढे येत आहेत. लोकांना काळी जादू आणि वशीकरण करून प्रश्न सोडवतो असे सांगून फसवणूक करणाऱ्या बाबाचा धक्कादायक चेहरा समोर आला आहे. हा बाबा 2 वर्षेपूर्वीपर्यंत भंगार व्यवसाय करत होता. 
 
लॉकडाउन काळात भंगार व्यवसाय पूर्ण बसला आणि झटपट पैसे कमावण्यासाठी त्याने हा बाबाचा धंदा सुरू केला. त्यातून त्याची चांगली कमाई सुद्धा सुरू झाली. शहरातील अनेक नामवंतांकडून त्यानं चांगली कमाई केली. मात्र झी मीडियाने या बाबाचा भोंदूपण उघड केला आणि त्यामुळे पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

नेमकं काय आहे प्रकरण? 
स्वत:ला तंत्र मंत्र सम्राट, मिया मुसाजी म्हणवणाऱ्या या बाबाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. स्टींग ऑपरेशन करून झी 24 तासनं औरंगाबादच्या या भोंदूचं पितळ उघडं केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी या बाबाच्या आलिशान कार्यालयावर छापा टाकत बेड्या ठोकल्या. पोलिसी हिसका दाखवताच बाबा पोपटासारखा बोलू लागला.
 
मूळचा मेरठचा असणारा हा मिया मुसाजी, दोन वर्षांपूर्वी मित्रांसोबत भंगार व्यवसाय करत होता. मात्र लॉकडाऊनमध्ये त्याचा व्यवसाय पूर्ण बसला. डोक्यावर कर्जाचा डोंगर झाला. त्यामुळेच झटपट पैसे कामावण्यासाठी तो बाबा बनला. काळी जादू, वशीकरण, पैशांचा पाऊस, सगळ्या समस्यांवर उत्तर अशी बतावणी करून हा बाबा लोकांची लूट करायचा. झी 24 तासनं त्याचं स्टींग ऑपरेशन केलं आणि बाबाची काळी कृत्य चव्हाट्यावर आली.
 
भंगाराच्या धंद्यातून लोकांशी कसं बोलावं, त्यांना बोलण्यात कसं फसवावं याची त्याला कल्पना आली होती. त्य़ाचाच फायदा घेत भोंदू बाबानं लुटीचा गोरखधंदा सुरू केला. हा प्रकार फक्त औरंगाबादपुरता मर्यादित नाही, तर राज्यभर असे अनेक बाबा तुमच्या कष्टाची कमाई लुटण्यासाठी बसले आहेत. त्यामुळे याबाबांचं सावज होण्यापूर्वीच सावध व्हा. कुणी काळ्या जादूच्या नावावर तुमची फसवणूक करत असेल तर तात्काळ पोलिसांनी माहिती द्या.