Baba Siddique Shot Dead: बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे. राजकीय व्यक्तीच्या हत्येनंतर राजकारणातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. शनिवारी रात्री 9:30 च्या सुमारास बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या आहेत. तीन आरोपींनी त्यांच्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. यात त्यांच्या छातीला गोळी लागली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, 11.25 च्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तर एक आरोपी फरार आहे. अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे धर्मराज आणि करनैल अशी आहेत. तर आता तिसऱ्या आरोपीचेही नाव समोर आले आहे. तिसऱ्या फरार आरोपीचे नाव शिवा असं असून तो जवळपास 5 ते 6 वर्षांपासून पुण्यात राहत होता. पुण्यातील स्क्रॅप व्यापाऱ्याकडे तो काम करत होता.
सूत्रांनुसार, आरोपी शिवाने काही महिन्यांपूर्वीच धर्मराजला पुण्यात कामासाठी बोलवले होते. तसंच, सुपारी देणाऱ्या व्यक्तीने शिवा आणि धर्मराजची करनैलसोबत ओळख करुन दिली होती. करनैलवर आधीही एका हत्येचा गुन्हा होता. तर, इतर दोन आरोपींवर कोणताही गुन्हा याआधी दाखल नव्हता. तसंच, शिवकुमार हा बहराइच येथील रहिवासी आहे. तर, दुसरा आरोपी धर्मराजदेखील त्याच गावाचा आहे.
धर्मराज कश्यप आणि शिवकुमार उर्फ शिव गौतम मजुरी करण्यासाठी पुण्यात आले होते. बहराइच पोलीस शिवकुमार गौतम आणि धर्मराज कश्यप यांचा अपराधिक रेकॉर्ड शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
मुंबई पोलिसांची पाच पथके महाराष्ट्राबाहेर तिसरा आरोपी शिवकुमार गौतम याचा शोध घेत आहेत. उज्जेन, हरियाणा मध्य प्रदेशातील देवस्थाने या ठिकाणी पोलिस तपास करत आहेत. तसंच, हल्लेखोर एकमेकांशी मेसेंजरद्वारे एकमेकांशी संपर्कात असल्याची माहिती समोर येत आहे. बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला करणारे चार हल्लेखोरांना जवळपास तीन लाख रुपये ऍडव्हान्स दिली असल्याची माहिती समोर येत आहे.