Baba Siddique Death News: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांची शनिवारी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तीन आरोपींनी त्यांच्या वांद्रे पूर्व येथील कार्यालयाबाहेर गोळ्या झाडल्या. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणात तीन आरोपींना अटक केली असून हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने स्वीकारली आहे. पोलिसांनी आरोपीच्या शोधासाठी 15 पथके तयार केली असून देशभरातून शोध घेतला जात आहे.
मुंबई पोलिसांनी दोन हल्लेखोरांना शनिवारी अटक केली आहे. गुरमैल सिंग आणि धर्मराज कश्यप अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर, शिवकुमार या नावाचा आरोपी फरार आहे. शिवकुमार हा मुळचा उत्तर प्रदेश येथील असून तिथे ही पोलिसांचे पथक शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शिवकुमार गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कामासाठी आला होता. या प्रकरणी त्याच्या कुटुंबीयांचीही चौकशी केली जात आहे.
शिवकुमार याच्या शोधासाठी पोलिस त्याच्या मुळगावी देखील पोहोचले आहेत. शिवकुमारच्या आईने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला या घटनेबाबत आत्ताच माहिती मिळाली. माझा मुलगा पुण्यात भंगारचं काम करायचा. त्यासाठीच पुण्याला जातोय असं त्याने सांगितलं होतं. तो मुंबईत काय करत होता, हे आम्हाला माहिती नाही. तो १८-१९ वर्षांचा आहे. गेल्या आठ-नऊ दिवसांत त्याच्याशी काहीही बोलणं झालं नाही, त्यामुळे तो आता कुठं आहे, आम्हाला माहिती नाही.
आरोपी गुरमैल सिंग याची आजी फुली देवी यांनीही इंडिया टुडेशी बोलताना यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. २०१९ मध्ये मध्ये एका हत्येचा आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती. तेव्हापासून तो तुरुंगात होता. तीन महिन्यांपूर्वी तो जामिनावर बाहेर आला, तेव्हा काही मिनिटांसाठी तो घरी आला होता. त्यानंतर तो निघून गेला. तेव्हापासून आमचा त्याच्याशी काहीही संपर्क नाही.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात शुभम लोणकरचा २८ वर्षीय भाऊ प्रवीण लोणकर याला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. शुभम लोणकरसह धर्मराज कश्यप आणि शिवकुमार गौतम यांना या कटात सामील करून घेतलेल्या कटकारस्थानांपैकी तो एक आहे.