Devendra Fadanvis Trendig: बदलापूर अल्पवयीन मुलीचे शोषण करणारा आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झालाय. त्याच्या मृत्यूनंतर सोशल मीडियात आनंद व्यक्त केला जातोय. तर फाईल बंद करण्यासाठी अक्षयचा एन्काऊंटर करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. दरम्यान अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर सोशल मीडियामध्ये देवेंद्र फडणवीस, देवा भाऊ आणि एन्काऊंटर हे शब्द ट्रेण्ड होत आहेत. काय आहे हा ट्रेण्ड जाणून घेऊया.
बदलापूरच्या शाळेतील 2 विद्यार्थीनींवर अत्याचार करणाऱ्या मुख्य आरोपी अक्षय शिंदे यांचा पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मृत्यू झाला आहे. सोमवारी संध्याकाळच्या सुमारास मुंब्रा बायपासजवळ पोलिस वाहनातच हा गोळीबार झाला. या घटनेत बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. यावेळी पोलीस वाहनात असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे हे जखमी झाले आहेत. अक्षयने एका पोलिस अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून तीन गोळ्या झाडल्या. यानंतर स्वरंक्षणार्थ पोलिसांना गोळी चालवावी लागली. यात अक्षयचा मृत्यू झाल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
बदलापूर अत्याचार प्रकरण समोर आल्यानंतर जनतेचा संताप अनावर झाला होता. संतप्त नागरिकांनी बदलापूर स्थानकात रेल रोको केला होता. यावेळी आरोपीला आजच फाशी द्या, अशी मागणी आंदोलकांकडून केली जात होती. देवेंद्र फडणवीस हे राज्यातील गृहविभागाचे प्रमुख आहेत. पोलिसांच्या ताब्यात असताना अक्षय शिंदेचा मृत्यू झाला. यामुळे विरोधकांकडून गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी होतेय. तर दुसरीकडे अक्षय शिंदेच्या मृत्यूनंतर देवेंद्र फडणवीस आणि गृहविभागाचे कौतुक केले जात आहे.
काल 23 सप्टेंबर रोजी दिवसभर 'देवा भाऊ' हा शब्द ट्रेण्डमध्ये होता. त्यानंतर आता एन्काऊंटर आणि देवेंद्र फडणवीस हा शब्द एक्स (आधीचे ट्विटर)वर ट्रेंण्डिंग आहे. यासोबतच 'देवाचा न्याय' शब्द ट्रेण्डवर असून यात देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले जात आहे.
हैदराबाद प्रकरणात आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला त्याप्रमाणे अक्षय शिंदेचा नियोजितरित्या एन्काऊंटर केल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. अक्षय शिंदेचा मृत्यू व्हावा, अशी जनतेची मागणी होती. मग त्याचा मृत्यू झाला तर वावग असं काय? असा प्रश्न सत्ताधारी पक्षाच्या काही नेत्यांकडून विचारला जातोय. या सर्व पार्श्वभूमीवर एन्काऊंटर हा शब्ददेखील एक्सवर ट्रेण्ड होतोय.
बदलापूर येथील नामांकित शाळेतील दोन चिमुरड्या मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणात अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली होती. अक्षयच्या पहिल्या पत्नीने त्याच्याविरोधात अनैसर्गिक अत्याचाराची तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी अक्षयला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांचे पथक सोमवारी तळोजा कारागृहात पोहोचले होते. संध्याकाळी सहाच्या सुमारास मुंब्रा बायपास मार्गावर अक्षयने एका अधिकाऱ्याची बंदूक हिसकावून तीन गोळ्या झाडल्या होत्या. तेव्हा स्वसंरक्षणासाठी पोलिसांनी गोळीबार केला त्यात अक्षय शिंदे याचा मृत्यू झाला. तर पोलिस निरीक्षक मोरे हे जखमी झाले आहे.
अक्षय शिंदे यांने पोलिसांवर गोळीबार केल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कामात अडथळा आणणं आणि पोलिसांवर हल्ला या दोन मोठ्या कारणांमुळं त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे. मुंब्रा पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षयने पोलिसांवर तीन गोळ्या झाडल्या होत्या. त्या प्रकरणीच हे पाऊल उचलण्यात आले आहे.