प्रियकाराला संताप, प्रेयसीला ऍसिड आणि पेट्रोल टाकून जाळले

 प्रेयसीला ऍसिड आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडलाय.

Updated: Nov 15, 2020, 06:18 PM IST
प्रियकाराला संताप, प्रेयसीला ऍसिड आणि पेट्रोल टाकून जाळले

विष्णू बुरगे, झी २४ तास बीड : प्रेयसीला ऍसिड आणि पेट्रोल टाकून जाळण्याचा धक्कादायक प्रकार बीडमध्ये घडलाय. यामध्ये तरुणीचा मृत्यू झालाय. ही तरुणी आणि तिचा प्रियकर दोघेही पुण्याला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होते. दोघेही पुण्याहून नांदेडला परतत होते. त्यावेळी बीडमधल्या येळंब घाटात या तरुणानं गाडी थांबवली. त्यानंतर  तरुणाने प्रेयसीच्या अंगावर एसिड टाकलं आणि तिथून तो पळून गेला. त्यानंतर तब्बल १२ तास ही तरुणी खड्ड्यात पडून होती. रस्त्यावरुन जाणाऱ्यांना आवाज आल्यानं ही धक्कादायक गोष्ट उघड झाली. तरुणीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण तिचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. 

बीडच्या येळंब घाटात ही तरुणी तब्बल १२ तास मृत्यूशी झुंज देत पडून होती. तिच्या प्रियकरानं ऍसिड आणि पेट्रोल टाकून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. पुण्यात लिव्ह इनमध्ये राहणारी ही तरुणी प्रियकरासोबत गावाकडं येत होती. त्यावेळी येळंब घाटात प्रियकरानं तिच्यावर ऍसिड आणि पेट्रोल टाकून तिला जाळलं. त्यानंतर तो पळून गेला. पीडित तरुणीचाही दुर्देवी मृत्यू झालाय. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून आरोपीला कठोरात कठोर शिक्षेची मागणी होऊ लागलीय.

राज्यात महिलांवर अत्याचाराच्या घटना वाढल्यात. गुन्हेगारांवर वचक बसवणारा दिशा कायदा कधी येणार असा सवाल भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उपस्थित केलाय.

महिन्याभरात धुळे जिल्ह्यात सामूहिक बलात्कार आणि हत्येची दोन प्रकरणं घडलीयत. आता या बीडच्या प्रकरणानं महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न किती गंभीर झालाय हे अधोरेखित झालंय.