विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : सोसायटी निवडणुकीनंतर पांगरी गोपीनाथ गड ग्रामपंचायत (Grampanchayat Election) देखील राष्ट्रवादीच्या (NCP) ताब्यात आली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना पुन्हा एकदा धक्का बसला आहे. सहा पैकी दोन ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात आलेल्या आहेत. त्यामुळं पांगरी सरपंच पदासाठी बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीमधील पहिला निकाल हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाजूने आला. गोपीनाथ गडची पांगरी ग्रामपंचायत धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपल्याकडे खेचल्याने पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसलाय. परळी मतदारसंघांमध्ये सहा ग्रामपंचायती बिनविरोध ठरल्या आहेत. त्यात पांगरी गोपीनाथ गड या ठिकाणची चर्चा सर्वत्र होत आहे. तर तळेगाव ही ग्रामपंचायत देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आली आहे.
अस्वलंबा ग्रामपंचायतीत पंकजा मुंडे यांचा धनंजय मुंडेंना धक्का
दुसरीकडे, परळी मतदारसंघातीलच अस्वलंबा ग्रामपंचायत पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीच्या धंनजय मुंडे यांना जोरदार धक्का दिला आहे. सरपंचांसह पाच जागा बिनविरोध जिंकून पंकजाताई मुंडे यांनी आपलं वर्चस्व कायम राखलं आहे. ही ग्रामपंचायत धनंजय मुंडेंना एकदाही जिंकता आली नाही हे विशेष. भाजपचे ज्येष्ठ नेते जीवराज ढाकणे यांच्या हातात अस्वलंबा ग्रामपंचायतीची सुत्रे पुन्हा एकदा आली आहेत. नऊ सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीत सरपंचपद हे अनुसुचित जातीसाठी राखीव होते. सरपंचपदाचे उमेदवार दत्तू महादेव जोगदंड हे बिनविरोध सरपंच म्हणून निवडून आले आहेत.
परळीतल्या दोन ग्रामपंचायती टीपी मुंडेंच्या ताब्यात
परळी मतदार संघात बिनविरोध झालेल्या दोन ग्रामपंचायती टीपी मुंडे यांनी ताब्यात घेतल्या आहेत. तर एक ग्रामपंचायत फुलचंद कराड यांच्या भगवान सेनेने ताब्यात घेतली. हे दोन्ही नेते सध्या भाजपमध्ये आहेत.
भाजपचे वर्चस्व टिकवण्यासाठी पंकजा मुंडे यांना करावी लागणार कसरत
परळी मतदारसंघातील सहा ग्रामपंचायतीचा निकाल बिनविरोध जाहीर झाला असला तरी यात आकडेवारी आणि नेत्यांचा विचार केला तर चार ग्रामपंचायती या भाजपच्या ताब्यात असल्या असत्या. मात्र तशी जुळवाजुळ किंवा भाजपा कडून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं नाही. तेथील प्रत्येक नेत्याने आपलं वर्चस्व असल्याचं सांगितलं. त्यामुळे या सर्व नेत्यांना आपण एकत्र आहोत असे दाखवण्याचे आव्हान पंकजा मुंडे यांच्यासमोर आहे.