नाद केलाय भावानं, कौतुक केलंय गावानं! पठ्ठ्याने 10 वेळा नापास होत शेवटी 11व्या प्रयत्नात मिळवलं यश

Beed Krishna Munde 10th Result: तुम्ही म्हणाल बोर्डातून पहिला आलाय? तर नाही. तुम्हाला वाटेल त्याला 90 टक्के मिळालेयत?...तर तसंही नाहीय.

Pravin Dabholkar | Updated: May 28, 2024, 09:37 PM IST
नाद केलाय भावानं, कौतुक केलंय गावानं! पठ्ठ्याने 10 वेळा नापास होत शेवटी 11व्या प्रयत्नात मिळवलं यश title=
Beed Krishna Munde 10th Result

Beed Krishna Munde 10th Result: राज्यात नुकताच दहावीची निकाल जाहीर झाले. यात अनेक जण पास झाले तर काही जण नापास झाले. पण यासोबतच काही आर्श्चयकारक गोष्टीसमोर येत आहेत. अशातच जिद्द काय असते? याची व्याख्या सांगणारी एक घटना बीडमधून समोर आली आहे. बीडमध्ये एका विद्यार्थ्यांने 11 व्या प्रयत्नात दहावीच्या वर्गात यश मिळवलं. तब्बल 10 वेळा दहावीला नापास या मुलाने वडिलांच्या इच्छेसाठी जिद्दीला पेटून 11 व्या वर्षी यश मिळवलं आहे. यानंतर संपूर्ण गावाने त्यांची थेट मिरवणूकच काढली. या विद्यार्थ्याची सध्या राज्यभरात चर्चा सुरू आहे.

दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षेत 80-90 टक्के मिळवणाऱ्यांचे कौतुक होताना तुम्ही पाहिले असेल. त्यांचे मोठमोठे सत्कारही होतात. पण परळीतल्या डावी येथील कृष्णा सायस मुंडे याला गावाने डोक्यावर उचलून धरलंय. त्याची चर्चा सध्या गावभर आहे. कारण काय तर कृष्णा दहावी पास झालाय. बरं तुम्ही म्हणाल बोर्डातून पहिला आलाय? तर नाही. तुम्हाला वाटेल त्याला 90 टक्के मिळालेयत?...तर तसंही नाहीय. बीडच्या कृष्णा मुंडेनं अकराव्या प्रयत्नात दहावी उत्तीर्ण केलीय. निराश न होता सतत प्रयत्न करणाऱ्या कृष्णाच्या जिद्दीचं कौतुक केलं जातंय.

 जिद्द ना सोडली 

बीडमधील कृष्णाला दहावी परीक्षेत तब्बल दहा वेळा अपयश आले. पण तो निराश झाला नाही. त्याने दहावी पास होण्याची जिद्द सोडली नाही आणि अकराव्या वेळेस त्याला यश मिळाले. आता त्याचे हे यश गावकऱ्यांनीच साजरे केल्याचे पाहायला मिळत आहे. 

 कृष्णाची गावातून मिरवणूक

दहावीचा निकाल लागल्यानंतर गावकऱ्यांनी कृष्णाची गावातून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी गावाला साखरही वाटण्यात आली. त्याच्या या यशाचा कुटुंबीयांनाही आनंद झालाय. आता कृष्णा यापुढे जे काही शिक्षण घेईल ते देण्यासाठी आम्ही तयार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. 

अतिशय सामान्य कुटुंबात जन्म

कृष्णा हा अतिशय सामान्य कुटुंबातील असून अशा परिस्थितीही त्याने दहावी उत्तीर्ण होण्याची जिद्द सोडली नाही. आता पुढचे शिक्षण त्याला घ्यायचे असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. कृष्णाच्या या यशाचे आणि गावकऱ्यांनी केलेल्या सत्काराची आता जिल्ह्यात चर्चा होताना दिसत आहे.