'सैराट'ची पुनरावृत्ती : पोलिसांच्या हाती मोठा पुरावा

बीडमधील 'सैराट' प्रकाराच्या हत्याकांडाने सगळा महाराष्ट्र हादरला असताना पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू केलाय. यात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय.   

Updated: Dec 20, 2018, 07:49 PM IST
'सैराट'ची पुनरावृत्ती : पोलिसांच्या हाती मोठा पुरावा  title=

बीड : अवघ्या महाराष्ट्राला शरमेनं मान खाली घालायला लावणारी घटना बीडमध्ये घडली. 'सैराट' प्रकाराच्या हत्याकांडाने सगळा महाराष्ट्र हादरला असताना पोलिसांनी फरार आरोपींचा शोध सुरू केलाय. यात मोठा पुरावा पोलिसांच्या हाती लागलाय. आरोपींनी हत्येसाठी वापरलेली गाडी बीड शहराच्या उत्तरेला असलेल्या नवीन मोंढा भागातील बायपास रोडवर बेवारस पोलिसांना आढळली आहे. याच गाडीतून आरोपी बालाजी लांडगे आपल्या मित्रांसह आला आणि सुमीत वाघमारेची हत्या करून पसार झाले. 

बीडमध्ये 'सैराट' थरार, बहिणीने मनाविरुद्ध लग्न केल्याने मेव्हण्याची हत्या

प्रेमविवाह केला म्हणून बहिणीच्या नवऱ्याचा भर रस्त्यात दिवसाढवळ्या  मेव्हण्याने खून केला. मात्र प्रकरण एवढ्यावर संपत नाही. पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच हे हत्याकांड घडल्याचं समोर आले आहे. पोलिसांनी वेळीच लक्ष दिलं असतं तर बीडमध्ये सैराट घडलं नसते, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. बेदरकार पोलीस, हेकेखोर नातेवाईक आणि मुजोर राजकारण्यांच्या घाणेरड्या वृत्तीने बळी घेतल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

'सैराट'ची पुनरावृत्ती : मृताच्या पत्नीचा धक्कादायक जबाब

रस्त्यात तडफडत प्राण सोडलेला सुमीत वाघमारे आणि आक्रोश कऱणारी त्याची पत्नी भाग्यश्री यांचा दोष काय तर त्यांनी प्रेमविवाह केला. अभियांत्रिकीच्या वर्गात शिकत असताना भाग्यश्री लांडगे आणि सुमीत वाघमारे यांचे प्रेमसंबंध जुळले. त्यांच्या प्रेमाला भाग्यश्रीच्या भावाचा म्हणजे बालाजीचा तीव्र विरोध होता. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी पळून जाऊन लग्न केलं. त्यामुळे बालाजी संतापाने धुमसत होता. सुमीत आणि भाग्यश्री अभियांत्रिकीची परीक्षा देण्यासाठी महाविद्याविद्यालयात आल्याचं कळताच बालाजीने डाव साधला आणि आपल्या मित्रांसोबत चाकूचे सपासप वार करून  भर रस्त्यावर सुमीतची निर्घृण हत्या केली. 

रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या सुमीतच्या बचावासाठी भाग्यश्री अक्षरशः टाहो फोडून लोकांना बोलवत होती, पण कोणीही मदतीला आलं नाही. मोबाईलमध्ये घटना चित्रीत करण्यातच बीडकरांनी धन्यता मानली. वेळेवर उपचार न मिळाल्याने सुमीतचा मृत्यू झाला. बीडकरांच्या संतापजनक दिरंगाईपेक्षाही पोलिसांचं वर्तन अधिक संतापजनक असल्याचं उघड झालंय. वारंवार आपल्याला धमक्या येत होत्या, पण पोलिसांनी आपली तक्रार न घेता आपल्याला हाकलून दिलं. एवढंच काय याआधीही गाडीखाली चिरडून मारण्याचा प्रयत्न झाला होता, असा खळबळजनक आरोपही भाग्यश्रीने केलाय. 

पोलिसांनी हाकलून दिलं, राजकीय दबावातून पोलीस कारवाई करत नव्हते, कट मारून मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप भाग्यश्री वाघमारे हिने केलाय. अखेर खून झाल्यावर पोलिसांचे डोळे उघडलेत. पोलिसांनी छापासत्र सुरू केले. पण वेळ निघून गेली होती, आरोपी पसार झालेत. वारंवार तक्रार करूनही या दाम्पत्याकडे लक्ष न देता हलगर्जीपणा दाखवणारे पोलीस कोण याची चौकशी तातडीने होणं गरजेचं आहे, अशी मागणी होत आहे.

तसेच पोलिसांवर कारवाई न करण्यासाठी राजकीय दबाव टाकणारा राजकीय नेता कोण याचाही शोध घेणं गरजेचं आहे. असे गावगुंडी करणारे राजकारणी आणि त्यांच्या खिशातले पोलीस यांच्या आधी मुसक्या आवळण्याची गरज आहे. नाही तर सुमीतसारख्या अशा अनेकांचे दिवसाढवळ्या खून पडत राहतील आणि हळहळ करण्याव्यतिरिक्त आणि मोबईलमध्ये चित्रीकऱण करण्याव्यतिरिक्त महाराष्ट्राच्या हाती काहीही उरणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.