राज्यातील या मंदिराला धमकीचं पत्र...मंदिराला कोण करते टारगेट?

वैद्यनाथ मंदिरानंतर आता आणखी एका मंदिराला उडवण्याची धमकी

Updated: Nov 28, 2021, 02:34 PM IST
राज्यातील या मंदिराला धमकीचं पत्र...मंदिराला कोण करते टारगेट?

विष्णु बुर्गे, झी 24 तास, परळी: बारा ज्योतिर्लिंगापैकी परळी-वैद्यनाथ देवस्थानला दोन दिवसापूर्वी धमकीचे पत्र मिळालं होतं. आता पुन्हा एकदा धमकीचं पत्र आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. वैद्यनाथ देवस्थानला 50 लाख रुपये द्या अन्यथा आरडीएक्सने उडवून टाकू अशी धमकी दिली होती.  

आता बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील लाखो भाविक भक्तांचे श्रद्धास्थान अंबेजोगाई येथील योगेश्वरी देवी मंदिर संस्थांच्या नावाने देखील अशाच पद्धतीचे धमकीचं पत्र आलं आहे. या पत्रामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 

दोन दिवसापूर्वी परळी वैजनाथ देवस्थानला 50 लाख रुपयांची मागणी करणारे पत्र मिळालं होतं. आता दुसरं धमकी पत्र अंबाजोगाईच्या योगेश्वरी देवीच्या नावाने पाठवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या दोन्ही पत्रावर नांदेड जिल्ह्यातील पत्ता देण्यात आला आहे. 

योगेश्वरी देवस्थान कमिटीच्या नावाने आलेल्या पत्रामध्ये 50 लाख रुपये द्या नाहीतर मंदिर उडवून देऊ अशी धमकी सुद्धा देण्यात आली आहे. पत्र प्राप्त होताच मंदिर कमिटीने पोलिसांना याची माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे. 

हे पत्र कोणी पाठवलं याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. बीडमधील दुसऱ्या मंदिराला हे पत्र आल्याने आता खळबळ उडाली आहे.