रत्नागिरी : लॉकडाऊनमध्ये दारू विक्री ( liquor) करताना गुहागर पोलिसांनी (Police) शिवसेनेचे (Shivsena) उपतालुका प्रमुख बाबू सावंत यांच्यावर कारवाई केली होती. त्यावर गुहागरचे सेनेचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी पोलिसांचाच समाचार घेतला. पोटापाण्यासाठी दारू विकली तर काय झालं ? तुम्ही पोलीस हप्ते घेत नाही का, असं म्हणत मी तुमच्या पाठीशी आहे, असे भास्कर जाधव यांनी जाहीर कार्यक्रमात म्हटले. भास्कर जाधवांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा आहे. गुहागरमधील एका राजकीय व्यसपीठरून भाषण करताना भास्कर जाधव यांनी हे वक्तव्य केले आहे. त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
भास्कर जाधव यांनी दारु विक्रीचे समर्थन केल्याने जोरदार चर्चा सुरु झाली आहे. त्याचवेळी त्यांनी फक्त दोन गोष्टींसाठी मला फोन करू नका, असे म्हटेल आहे. मुलींची छेडछाड आणि चोरीबाबत मला फोन करायचा नाही, असे स्पष्टपणे बजावले आहे. बाकी कोणत्याही गोष्टीला तुम्ही घाबरू नका, भास्कर जाधव तुमच्या पाठीशी आहे असेही ते म्हणालेत.
दरम्यान, भाजपचा बुद्धीभ्रंश झाला आहे. आपल्या केंद्रातील नेत्यांना खुश करण्यासाठी भाजप अर्णब गोस्वामीकरिता आंदोलन करत आहे. शिवाय आपण २०१८ साली बंद केलेली, दडपून टाकलेली केस ओपन झाली तर आपण अडचणीत येऊ म्हणून भाजपचा हा कांगावा सुरु असल्याची टीका शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केली आहे.
बेछूट आरोप करायचे आणि दुसऱ्यानी खुलासे करायचे ही भाजपची व्यूहरचना आहे. पण महाविकास आघाडी सरकार मराठा आरक्षणकरिता कटिबद्ध आहे. न्यायालयीन लढाई लढून मराठा समाजाला आरक्षण मिळेल, असा विश्वास यावेळी भास्कर जाधव यांनी व्यक्त केला.