Abdul Sattar : छत्रपती संभाजीनगरला आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना हा असा जोरदार विरोध करण्यात आला.. सिल्लोडच्या कार्यक्रमात तर 'मुख्यमंत्री गो बॅक'असे पोस्टर झळकले. लोकसभेत महायुतीला मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा सर्वाधिक फटका बसला. त्यामुळेच विधानसभेतही हा फटका बसू नये म्हणून शिंदेंच्या शिवसेनेने जोरदार तयारी सुरु केली. लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभाचा मुहूर्त साधला. मात्र याच कार्यक्रमासाठी आलेल्या मुख्यमंत्र्याना जोरदार विरोध झाला. या आंदोलनात मराठा आरक्षणाचे कार्यकर्तेही सामिल झाले होते.
तर दुसरीकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गटातही सारं काही आलबेल नाही. अब्दुल सत्तार यांना संभाजीनगरचे पालकमंत्री पद दिल्यानंतर भाजप आणि शिंदे शिवसेनेचे अनेक नेते नाराज आहेत. पालकमंत्री असल्यानं संभाजीनगरच्या निवडणुकीचे सूत्रधार हे सत्तारच असण्याची शक्यता असल्यानं सत्तारांना विरोध होऊ लागलाय.
मित्र पक्षातील नेत्यांच्या तसंच कार्यकर्त्यांच्या मागण्यांकडे मंत्री अब्दुल सत्तार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे. भाजप नेते रावसाहेब दानवे यांना पाडण्यात सत्तारांचा मोठा वाटा असल्याचा आरोप आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नामुळेही सत्ताधारी पक्षातील नेते कोंडीत सापडलेत. आरक्षण मुद्द्यावर विधानसभेतही मराठवाड्यात फटका बसण्याची शक्यता आहे. शक्तिप्रदर्शनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांना विरोध नव्हता तर अब्दुल सत्तार यांना होता,अशी कबुली शिंदे शिवसेचे प्रवक्ते संजय शिरसाठ यांनी दिलीय, तर मुख्यमंत्र्यांना दाखवलेल्या काळ्या झेंड्यावरूनही विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीका केलीय.
मराठ्यांना आरक्षण न मिळाल्यानं मराठा समाज संतप्त आहे. येत्या 29 तारखेला आम्ही तोडगा काढू असं मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलीय. महाराष्ट्रात पुन्हा सत्ता येण्यासाठी महायुतीच्या नेत्यांना मराठवाड्यातून जास्तीत जास्त जागा जिंकाव्या लागतील. मात्र, मराठा आरक्षण आणि सत्तारांवरून महायुतीत निर्माण झालेले वितुष्टाचा फटका महायुतीला बसण्याची शक्यता आहे.