मुंबई : राज्यात आज कोरोनाचा स्फोट पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या रुग्णांची या वर्षातली सर्वात मोठी वाढ आज पाहायला मिळाली. दिवसभरात 13,659 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर ५४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबई, नागपूर, पुण्यात कोरोना रुग्ण वाढले आहेत. कल्याण-डोंबिवलीमध्ये रात्रीचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. तर धुळ्यात रविवारपासून 4 दिवसाचा जनता कर्फ्यू घेण्यात आला आहे.
पुण्यातही कोरोनाच्या रुग्णसंख्येत आज मोठी वाढ झाली आहे. आज दिवसभरात कोरोनाचे 1 हजार 352 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर कोरोनामुळे दिवसभरात 13जणांचा मृत्यू झाला आहे. 364 रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या पुण्यात कोरोनाचे 7 हजार 719 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
नागपुरात आज तब्बल 1 हजार 710 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळं सर्वांचीच चिंता वाढली आहे. नव्यानं आढळून आलेल्या रुग्णांमध्ये 1 हजार 433 रुग्ण शहरातील तर 275 ग्रामीण भागातील रुग्णांचा समावेश आहे.. कोरोनामुळे आज दिवसभरात 8 जणांचा मृत्यू झालाय.. मार्च महिन्यांपासून नागपुरात कोरोनाचा आलेख सातत्यानं वाढत आहे.. गेल्या 10 दिवसांत नागपुरात 12 हजारहून अधिक रुग्ण वाढले आहेत.
कल्याण डोंबिवली क्षेत्रात कोरोनाने पुन्हा कहर करायला सुरुवात केली आहे. दिवसभरात कल्याण डोंबिवलीमध्ये 392 नवे कोरोनाबाधित आढळून आलेत. सध्या 2360 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यातल्या त्यात दिलासादायक बाब म्हणजे २४ तासात एकाचाही मृत्यू झाला नाही. पण कोरोना रुग्णसंख्या 400 च्या जवळ गेल्याने आयुक्तांनी निर्बंध आणले आहेत.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन उस्मानाबादमध्ये दर रविवारी जनता कर्फ्यू लागू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 15 मार्चपासून जिल्ह्यातील सर्व मंगल कार्यालयं बंद राहतील. तसच जिल्ह्यातील सर्व आठवडी बाजारही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. उस्मानाबाद जिल्ह्यात मोर्चे, जाहीर सभांवरही बंदी घालण्यात आलीय. जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी कडक नियमावली जाहीर केलीय.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यात 31 मार्चपर्यंत नवे निर्बंध लागू करण्यात आलेत. लग्न समारंभात 20 पेक्षा जास्त लोकांना बंदी घालण्यात आलीय. नगरपरिषद हद्दीतील हॉटेल, रेस्टॉरंट बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर अत्यावश्यक सेवा वगळता जिल्ह्यातील दुकानं संध्याकाळी सातनंतर बंद असतील. याशिवाय सर्व दुकानदारांना दर 15 दिवसांनी कोविड टेस्ट करणं बंधनकारक असेल.