चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, अंबरनाथ : सकाळी ७ वाजून ६ मिनिटांची बदलापूर सीएसएमटी लोकल... लोकलमध्ये शेकडो प्रवासी... आणि आज या प्रवाशांसाठी देवदुत ठरले आरपीएफ जवान सुरेशकुमार मीना. सुरेश आज अंबरनाथ बी केबीन जवळ नसते तर मोठी दुर्घटना घडली असती.
लोकलमध्ये ऑफिसला जाणा-यांची लोकलमध्ये खच्चून गर्दी होती. लोकल अंबरनाथच्या बी केबीन परिसरात पोहचली आणि अचानक इमर्जन्सी ब्रेक लागले.
घडलं असं, राऊंडिंगवर असलेल्या आरपीएफ जवान सुरेशकुमार मीना यांना रेल्वे रुळाला तडा गेल्याचं दिसलं. त्यांनी भरधाव येणा-या या लोकलच्या दिशेनं धाव घेत मोटरमनला गाडी थांबवण्याचा इशारा दिला. मोटरमननं इमर्जन्सी ब्रेक लावत गाडी थांबवली. पण तोवर तुटलेल्या रुळावरून तीन डबे पुढे गेले होते. सुदैवान अनर्थ टळला होता.
तातडीनं दुरुस्ती करून रेल्वे प्रशासनानं लोकल सीएसएमटीच्या दिशेनं रवाना केली. त्यात दीड तास गेला. त्यानंतर रेल्वेनं अर्ध्या तासाचा विशेष ब्लॉक घेऊन हा आठ फुटांचा रुळ बदलला.
शेकडो प्रवाशांचे प्राण वाचवणा-या मीना यांचे रेल्वे प्रशासनानं आभार मानलेयत.
थंडीत रुळाला तडे जाण्याचे प्रकार नेहमीच घडतात. या दुर्घटनेसाठी रेल्वे प्रशासनाला जबाबदार धरता येणार नाही. पण ज्या तत्परतेनं सुरेशकुमार मीना यांनी प्रसंगावधान दाखवलं त्यामुळं मोठी दुर्घटना टळली, आणि मीना या प्रवाशांसाठी देवदुत ठरले.
आरपीएफचे सुरेशकुमार मीना ठरले शेकडो प्रवाशांसाठी ठरले देवदूत