एसटी संपाबाबत मोठी बातमी । राज्य सरकारने दिला अखेरचा अल्टीमेटम

ST Employees Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा. कर्मचाऱ्यांनो 31 मार्चपर्यंत कामावर रूजू व्हावे. कोणाचीही नोकरी जाणार नाही, असे आवाहन परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी केले आहे. 

Updated: Mar 25, 2022, 09:43 PM IST
एसटी संपाबाबत मोठी बातमी । राज्य सरकारने दिला अखेरचा अल्टीमेटम title=

मुंबई :  ST Employees Strike : एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा. कर्मचाऱ्यांनो 31 मार्चपर्यंत कामावर रूजू व्हावे. कोणाचीही नोकरी जाणार नाही, असे आवाहन परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी केले आहे. त्याचेळी जर कामावर रुज्जू झाला नाही तर हा अखेरचा पर्याय आहे, असा इशाराही देण्यात आला आहे.

संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर आमचा कोणताही राग नाही किंवा कोणताही आकस नाही. हे कर्मचारी वेगवेगळ्या आवाहनाला बळी पडले आहेत. त्यांच्या मनात गैरसमज पसरविले जात आहेत, असे सांगतानाच 31 मार्च, 2022 पर्यंत एसटीच्या संपकरी कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे, असे आवाहन एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात केले. तसेच कोणाचीही नोकरी जाणार नाही, कर्मचारी कामावर आल्यानंतर कर्मचाऱ्यांच्या इतर मागण्याबाबत चर्चा करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

 गेले अनेक महिन्यांपासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. या संपाबाबत अधिवेशन कालावधीमध्ये शासनाची भूमिका सभागृहात मांडण्याबाबतच्या सूचना दोन्ही सभागृहातील सभापती आणि अध्यक्ष यांनी दिल्या होत्या. याबाबत परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, यांनी आज दोन्ही सभागृहात निवेदन केले. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यासंदर्भात राज्य सरकारने वेळोवेळी बैठका घेऊन संपाची दखल घेत कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत, असे ते म्हणाले.

संपामुळे ज्येष्ठ नागरिक, सर्वसामान्य प्रवाशी यांच्याबरोबरच शाळकरी विद्यार्थी यांना नाहक त्रास होत आहे. सध्या मुलांच्या परीक्षा सुरु आहेत. अशा विद्यार्थांची गैरसोय होऊ नये यासाठी शाळांच्या मार्गावर जास्त गाड्या सुरु करण्यात येतील, अशी माहितीही मंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली. एसटी संपाबाबत मंत्री परब यांनी केलेल्या निवेदनावर विधान परिषद सदस्य जयंत पाटील, सदाभाऊ खोत यांच्यासह अनेक सदस्यांनी समाधान व्यक्त करत संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर परतण्याचे आवाहन केले.

कोरोनाच्या महामारीमुळे राज्यामध्ये अनेकांचे प्राण गेलेले आहेत. महामंडळातील 308 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून शासन निकषामध्ये बसणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना प्रत्येकी रुपये 50 लाखाची मदत महामंडळाने केली असून इतर मृतांच्या वारसांना प्रत्येकी रुपये 5 लाखाची मदत महामंडळाने केली आहे. मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी अथवा रुपये 10 लाखाची आर्थिक मदत देण्याची कार्यवाही महामंडळाकडून सुरु आहे, अशी माहिती अनिल परब यांनी दिली.