Sharad Pawar News: शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण निवडणूक आयोगाने बिगुल आणि पिपाणी चिन्ह गोठवले. शरद पवारांच्या तक्रारीनंतर हा निर्णय़ घेण्यात आलाय. अपक्ष उमेदवारांना आता पिपाणी चिन्ह मिळणार नाही. कारण ते चिन्हच गोठवण्यात आलं आहे.
निवडणुकीत चिन्ह किती महत्त्वाचं असतं, याचा अनुभव राष्ट्रवादी शरद पवार गटाला लोकसभा निवडणुकीत आला होता. तुतारी वाजवणारा माणूस अशी शरद पवारांच्या पक्षाची अधिकृत निशाणी. मात्र, याच तुतारीसारखी दिसणारं पिपाणी हे निवडणूक चिन्ह लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवारांना देण्यात आले. त्यामुळं राष्ट्रवादीच्या अधिकृत उमेदवारांना मोठा फटका बसला.
राष्ट्रवादी शरद पवार गटानं लोकसभेला 10 जागा लढवल्या. त्यापैकी 8 खासदार निवडून आले. यापैकी जवळपास प्रत्येक मतदारसंघात पिपाणी या चिन्हावरील अपक्ष उमेदवारांनी हजारो मतं खाल्ल्याचं दिसून आलं. तुतारी आणि पिपाणीचा घोळ झाला नसता तर साता-याचा खासदारही निवडून आला असता, असं आकडेवारीवरून स्पष्ट होतंय.
साता-यात भाजपच्या उदयनराजेंनी राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेंचा 32,771 मतांनी पराभव केला. याठिकाणी पिपाणी चिन्हावर लढलेल्या संजय गाडे या अपक्ष उमेदवाराला 37 हजार 62 मते मिळाली. दिंडोरीत तर राष्ट्रवादी उमेदवाराचं नाव आणि निवडणूक चिन्ह असा दुहेरी फटका बसला. भास्कर भगरे हे अधिकृत उमेदवार विजयी झाले. मात्र, त्यांच्या विरोधातील बाबू भगरे नावाच्या पिपाणीवाल्या अपक्ष उमेदवाराला तब्बल 1 लाख 3 हजार 632 एवढी भरघोस मतं मिळाली.
माढामध्ये रामचंद्र घुतुकडे या पिपाणीवाल्या अपक्ष उमेदवाराला 58 हजार 421 मतं मिळाली. बीडमध्ये अशोक थोरात नावाच्या पिपाणीवाल्या उमेदवाराला 54,850 मतं मिळाली. बारामतीत पिपाणीवाल्या शेख सोहेल शाह नावाच्या उमेदवाराला 14917 मतं पडली. नगरमध्ये पिपाणीवाल्या गोरख आळेकरांनी 44,597 मतं घेतली. रावेरमध्ये पिपाणीवाल्या एकनाथ साळुंखेंना 43957 मतं पडली. शिरूरमध्ये पिपाणीवाल्या मनोहर वाडेकरांना 28,324 मतं. भिवंडीत पिपाणीवाल्या कांचन वाखरेंना 24, 625 मतं मिळाली.
याचाच अर्थ एकूण 9 जागांवर पिपाणी चिन्हामुळे सुमारे 4 लाख 10 हजार 385 मतांचा फटका बसल्याचा राष्ट्रवादीचा दावा आहे... लोकसभा निवडणूकीमध्ये शरद पवारांच्या पक्षाला पिपाणीमुळे बसलेल्या फटक्यानंतर विधानसभेआधी पक्षाने खबरदारी घेतली.. विधानसभेमध्ये हा फटका टाळण्यासाठी पक्षाने दिलेल्या लढ्याला यश आलं आहे. राष्ट्रवादीच्या मागणीनुसार आता निवडणूक आयोगाने पिपाणी चिन्हच गोठवलंय.. त्यामुळे आता मतदान यंत्रांवर 'तुतारी वाजवणारा माणूस' हेच चिन्ह दिसणार आहे.