शरद पवारांच्या पुस्तकातील गौप्यस्फोटानंतर फडणवीस देणार जशास तसं उत्तर, म्हणाले, "मी योग्य वेळी..."

Devendra Fadnavis on Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांच्या 'लोक माझे सांगाती' पुस्तकाच्या सुधारित भागाचं आज प्रकाशन करण्यात आलेलं असून यामध्ये अनेक नवे गौप्यसफोट करण्यात आले आहेत.   

शिवराज यादव | Updated: May 2, 2023, 12:20 PM IST
शरद पवारांच्या पुस्तकातील गौप्यस्फोटानंतर फडणवीस देणार जशास तसं उत्तर, म्हणाले, "मी योग्य वेळी..." title=

Devendra Fadnavis on Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (NCP Leader Sharad Pawar) यांच्या 'लोक माझे सांगाती' (Lok Majhe Sangati) पुस्तकाच्या सुधारित भागाचं आज प्रकाशन करण्यात आलं आहे. या पुस्तकात 2015 पासून ते आतापर्यंतच्या अनेक गोष्टींचा उलगडा करण्यात आला आहे. दरम्यान या पुस्तकातून शरद पवारांनी पहाटेचा शपथविधी, शिवसेनेतील बंड अशा अनेक मुद्द्यांवर भाष्य करत गौप्यस्फोट केले आहेत. यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असून भाजपा नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. 

शरद पवारांकडून पहाटेच्या शपथविधीवर गौप्यस्फोट

शरद पवारांनी पुस्तकात सांगितलं आहे की, "पहाटे  6.30 वाजता माझ्या निवासस्थानी फोन खणखणला. अजितदादा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असल्याचं मला सांगण्यात आलं. जेमतेम 10 आमदार अजित पवार यांच्यासोबत असल्याची माहिती मला मिळाली. मविआचा पट उधळून टाकण्यासाठी केंद्र सरकार, भाजपा आणि राजभवनाचा रडीचा डाव होता. अजित पवारांना फूस लावून राजभवनात बोलावण्यात आलं होतं. अजित पवारांसह असणाऱ्या आमदारांना मात्र याची काहीच माहिती नव्हती. माझ्या संमतीनेच शपथविधी होत असल्याची समजूत आमदारांना करुन देण्यात आली होती. मी पहिला उद्धव ठाकरेंना फोन केला आणि याची माहिती दिली. त्यांना मी माझ्या समंतीने हा शपथविधी होत नसल्याचं सांगितलं". 

"भूकंपाचे हादरे बसण्याआधीच बंड मोडून काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. चव्हाण प्रतिष्ठानात 50 आमदार असल्याने आधीच बंडाची हवा निघून गेली होती. पत्नी प्रतिभा आणि अजित पवार यांच्यात जिव्हाळ्याचे संबंध आहेत. यामुळे अजित पवारांनी नंतर प्रतिभा यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली होती. आमच्यासाठी तेवढं पुरेसं असल्याने विषयावर पडदा पडला होता," अशी माहिती शरद पवार यांनी दिली आहे. 

देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया

शरद पवारांच्या गौप्यस्फोटानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना आपणही यावर पुस्तक लिहिणार असल्याची मिश्किल प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की "मी पुस्तक अजून वाचलेलं नाही, त्यामुळे मी त्याच्यावर भाष्य करणार नाही. पण हा जो प्रसंग आहे, त्यावर मी योग्य वेळी पुस्तक लिहिणार आहे. त्यावेळी तुम्हाला नेमकं काय घडलं होतं हे लक्षात येईल". 

"शिवसेनेत वादळ येईल याची कल्पना नव्हती"

दरम्यान पुस्तकात शरद पवार यांनी शिवसेनेतील बंडावरही भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्याने शिवसेनेत वादळ येईल याची कल्पना नव्हती असं शरद पवारांनी सांगितलं आहे. शिवसेनेतील असंतोष, उद्रेक शमवण्यासाठी नेतृत्व कमी पडलं अशी कबुलीही शरद पवारांनी दिली. तसंच बाळासाहेबांशी बोलताना जी सहजता जाणवत असे, ती उद्धव ठाकरेंसोबत जाणवत नव्हती असंही शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितलं.