जळगाव : निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा केली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेच्या जागेसाठी आग्रह धरला आहे. विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीत भाजपने उमेदवारी द्यावी, अशी मागणी खडसेंनी केली आहे. राज्यसभेसाठी शिफारस होऊनही निवड झाली नाही, पण आता विधानपरिषदेसाठी विचार करावा, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.
मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ खडसे यांना भाजपने उमेदवारी नाकारली होती. एकनाथ खडसे यांच्याऐवजी त्यांची सून रोहिणी खडसेंनी भाजपने तिकीट दिलं, पण रोहिणी खडसेंचा निवडणुकीत पराभव झाला. या पराभवानंतर एकनाथ खडसे नाराज झाले. तसंच त्यांनी राज्यातल्या भाजप नेतृत्वावर उघड टीकाही केली. दिल्लीतल्या पक्ष नेतृत्वाचीही खडसे यांनी भेट घेतली.
विधानपरिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी निवडणूक होणार आहे. ९ पेक्षा जास्त उमेदवारांनी विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल केले, तर निवडणूक होणार हे अटळ आहे. ११ मे रोजी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे, तर १४ मे रोजी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे.
अपक्षांसह भाजपकडे असलेलं संख्याबळ लक्षात घेता भाजपचे ४ उमेदवार सहज विजयी होतील असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.
विधानपरिषद निवडणुकीतील सुत्रानुसार उमेदवाराच्या विजयासाठी २९ मतांचा कोटा आवश्यक आहे. भाजपच्या १०५ आमदारांबरोबर १४ अपक्ष बरोबर असल्याचा दावा पाटील यांनी केला आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीची घोषणा झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विधिमंडळ सदस्य होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.