नवी मुंबईतील (Navi Mumbai) भूखंड विक्री प्रकरणावरून भाजप नेते आणि आमदार गणेश नाईक (Gamesh Naik) संतप्त झालेत. विधानसभेमध्ये गणेश नाईक यांचा आक्रमक चेहरा पाहायला मिळाला. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजपचे आमदार असलेले गणेश नाईक यांनी राज्य सरकारमधले काही अधिकारी आणि सिडकोचे काही अधिकारी भ्रष्ट असल्याचं सांगत मुख्यमंत्र्यांच्या शब्दाला काही किंमत आहे का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. एकप्रकारे एकनाथ शिंदेंवरच टीका असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे.
"गार्डनचे, मैदानाचे, हॉस्पिटलचे आणि शाळांचे भूखंड यासंबंधी मुख्यमंत्र्यांनी 13 महिन्यापूर्वी निर्देश देऊनही हे अधिकारी त्यावर कारवाई करायला तयार नाहीत. बिल्डरांच्या हितासाठी महानगरपालिकेला पाणीपुरवठा, स्वच्छतेसाठी आदेश दिले जातात. राज्य शासनात जे दलाल अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना उघड करण्यासाठी मी आरोप केले आहेत. जर मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला तुम्ही पाच पैशांची किंमत देणार नसाल तर तुम्ही तसं उत्तर द्या, आम्ही लोकांना सांगू," असं गणेश नाईक म्हणाले आहेत.
- लोकसभेला संजीव नाईक यांना तिकीट हवं होतं, ते मिळालं नाही. ती जागा शिंदे गटाकडे गेली.
- एकेकाळी नवी मुंबईचे अनभिषिक्त सम्राट असलेले नाईक गेल्या काही वर्षात बाजूला गेल्याचं चित्र
- सिडको आणि महापालिकेतील वर्चस्वाला गेल्या काही वर्षात छेद गेल्याचं चित्र
- एकनाथ शिंदेंकडून नाईक विरोधकांना बळ दिलं जात असल्याची चर्चा
- आता ऐरोलीवर शिंदे गटाचा दावा
नवी मुंबईत गणेश नाईक यांच्या मतदारसंघावर शिंदे गटाने दावा केला आहे. लोकसभेला शिंदे गटाच्या उमेदवाराला मोठी आघाडी ऐरोलीतून दिली, तसंच या मतदारसंघात शिंदे गटाचे जास्त नगरसेवक निवडून आले होते असं सांगत हा दावा करण्यात आला आहे. यामुळे भाजपा आणि शिंदे गटात नवी मुंबईत वाद उफळण्याची शक्यता आहे.
"मागच्या वेळी आम्ही युती म्हणून सहकार्य केलं. मोठा लीड आम्ही मिळवून दिला. पण याचं फलित काय मिळालं? विरोधी पक्षापेक्षा येथील स्थानिक नेते आम्हाला टार्गेट करतं. आम्हाला स्वत:चं अस्तित्व टिकवायचं आहे. ऐरोलीत शिवसेनेचे जास्त नगरसेवक आहे, त्यामुळे आम्ही ठाम राहणार आहोत. पुढे काय होईल ते पाहू," असं नवी मुंबईचे शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले म्हणाले आहेत.