सामनामधील अग्रलेखातून नारायण राणे आणि कुटुंबावर जहरी टीका करण्यात आली आहे. "भाजपचा आकडा महाराष्ट्रात नऊवर आला. या नऊमधले काही जण तर घातपाताने किंवा अपघाताने जिंकले. त्यातील एक महामानव म्हणजे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे हे आहेत. राणे हे काही जिंकण्याच्या स्थितीत नव्हते," असा टोला सामनातून लगावण्यात आला आहे. दरम्यान या टीकेला भाजपा आमदार नितेश राणे यांनी उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंना हिंमत असेल तर वरळीतून निवडणूक लढवून दाखवावी असं जाहीर आव्हानही दिलं आहे.
सामना अग्रलेखावलर बोलताना ते म्हणाले की, "लोकांनी शिवसेनेला नाकारलं हे सत्य राणे साहेबांनी सांगितल त्यामुळे संजय राऊत व विनायक राऊत यांना मिरच्या झोंबल्या आहेत. कोकणातला सामान्य मतदार हा पैसा खातो असं राऊत आणि ठाकरेंना वाटतं का? आमचा कोकणी माणूस कधीही कोणाजवळ कर्ज मागत नाही. घेतलेले कर्ज त्वरित फेडतो . आमच्या कोकणातील जनतेचा अपमान कोण करत असेल तर आमची जनता त्यांना गाडून टाकेल, उद्धव ठाकरेला कोकणातील जनता समजली नाही".
"उद्धव ठाकरेच्या विकास विरुद्ध प्रवृत्तीला जनतेने नाकारलं आहे. सामान्य मतदारांचा अपमान करण्याचं काम उद्धव ठाकरेंचे कारटे करत आहेत. उद्धव ठाकरेंनी कोकणातील जनतेची माफी मागावी. परत आम्ही कोकणात पाऊल ठेवायला देणार नाही," असा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. रवींद्र वायकर यांच्या विषयावर तीळपापड होत आहे नेहमी कॉपी करुन पास होणाऱ्या उद्धव ठाकरेंना पारदर्शक निकाल समजला नाही. कोकणातील जनता बिकाऊ आहे असा आरोप करुन संजय राऊतांना आमच्या जनतेचा अपमान करायचा आहे का?," अशी विचारणा नितेश राणेंनी केली आहे.
"हे कपाळ करंटे लोक यांना कोकणात पाऊल ठेवायला द्यायचं का हे जनतेने ठरवावे. यांचे जिथे जिथे खासदार निवडून आले तिथे ईव्हीएम हॅक झाले असं बोलायचं का? चायनीज मॉडेल असलेल्या संजय राऊतांना सगळं फेक दिसणार," अशी टीका त्यांनी केली आहे.
आदित्य ठाकरेंना जाहीर आव्हान देताना ते म्हणाले की, "भाजपाच्या कार्यालयात आम्हाला म्याव म्यावचा आवाज येत नाही. एलॉन मस्कचा आधार घेण्यापेक्षा वरळी कडे लक्ष द्या. तुझ्यात ठाकरेंच रक्त असेल तर वरळीतून उभा राहून दाखव. तुमच्या मानेवर बसून काँग्रेस 13 वर गेली आहे". हे ईव्हीएमच्या नावाने शेंबड्यासारखं रडणं ही त्यांची सवय झाली आहे अशी टीकाही त्यांनी आव्हाडांवर केली.
बॅनर युद्धावर ते म्हणाले की, "प्रत्येक पक्षात अतिउत्साही कार्यकर्ते बॅनर लावतात. त्याची दीपक केसरकर यांनी दाखल घेतली आहे. शिंदे साहेबांच्या शिवसेनेत काही उबाठाप्रेमी घुसलेले आहेत. त्यांना दूर करावं अशी मागणी आम्ही केली आहे". रोहित पवार स्वतः मंत्रिपदसाठी अजित पवारांच्या संपर्कात आहेत. ते अजित पवारांच्या बाजुला असतील असा दावाही त्यांनी केला.