अटक कि सुटका? नितेश राणेंचा फैसला उद्या

तब्बल साडेतीन तास दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तीवाद केला, वाचा नेमकं कोर्टात काय घडलं

Updated: Dec 28, 2021, 08:41 PM IST
अटक कि सुटका? नितेश राणेंचा फैसला उद्या  title=

सिंधुदुर्ग : शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील हल्ल्यानंतर भाजप आमदार नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. अटक होऊ नये यासाठी नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली होती. मात्र, तब्बल साडेतीन तासाच्या सुनावणी नंतर यावरील पुढील सुनावणी उद्या बुधवारी होणार आहे.

सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांच्यासमोर ही सुनावणी झाली. यावेळी नितेश राणे यांच्यावतीने वकील संग्राम देसाई यांनी तर, सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील प्रदीप घरत, भूषण साळवी आणि गजानन तोडकरी यांनी बाजू मांडली.

फिर्यादी संतोष परब यांनी वकील पत्रावर सही केली नव्हती. सरकारी वकिलांनी परब यांची सही घेतल्यानंतर कोर्टात युक्तिवाद सुरू झाला. नितेश राणे आणि सचिन सातपुते यांचं संभाषण पोलिसांनी हस्तगत केले. सीडीआर प्राप्त झाला. मग अजून काय हस्तगत करायचं आहे असा युक्तिवाद नितेश राणेंचे वकील संग्राम देसाई यांनी केला.

संशयितांची नावे एवढे दिवस गुप्त ठेवता मग नितेश राणे आणि गोट्या सावंत यांना नोटीस बजावली हे तपास अधिकाऱ्याला मीडीयाला सांगण्याची गरज काय होती? असा सवाल देसाई यांनी केला.

त्यावर सरकारी वकील घरत यांनी विधानसभा म्हटलं की तिथे कँटीन आलं. त्याठिकाणी विविध प्राणी हे येत असणार. विशिष्ठ प्राण्याचा आवाज काढला म्हणून सूड काढला हे चुकीचं आहे, असे स्पष्ट केले.  

गाडीला मागून धडक देणे हे जाणूनबुजून केलेले कृत्य आहे. परब यांना जाणूनबुजून जखमी केलं. हे करण्याचं कारण काय? ती अनोळखी माणस आहेत. मग त्यांनी फिर्यादीच्या हत्येचा प्रयत्न का केला.? आणि याच प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला तर तो गुन्हा केला? असा सवाल घरत यांनी केला.

हल्लेखोर असे म्हणतो कि नितेश राणे, गोट्या सावंत याना कळवायला पाहिजे. त्याने असे का म्हटले याचा शोध पोलिसांनी केला. तो ही वेळ घेऊन तपास केला. यापूर्वी पकडलेल्या आरोपींना वकील दिले नाहीत प्रतिपक्षाचे वकील सांगतात. पण, ते एवढे दिवस का गप्प बसलेत आणि आता त्यांची वकिली हे का करत आहेत, अशी उलट तपासणी घरत यांनी केली.

न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून सरकारी वकिलांना जामीन अर्जाबाबत समाधानी आहात का असे विचारले असता त्यांनी नाही असे सांगितले. हा युक्तिवाद तीन तास चालला होता. पण युक्तिवाद पूर्ण होऊ शकला नाही. उद्या ऊर्वरीत युक्तिवाद करू असं सरकारी वकिलांनी सांगितलं. अखेर न्यायालयाची वेळ संपल्याने यावरील सुनावणी उद्या घेण्याचा निर्णय कोर्टाने जाहीर केला.