'जनतेने मला स्वीकारलं नाही', पंकजा मुंडेंकडून पराभवाचा स्वीकार

 जनतेचा निर्णय मान्य असल्याचं म्हणत ....

Updated: Oct 24, 2019, 02:09 PM IST
'जनतेने मला स्वीकारलं नाही', पंकजा मुंडेंकडून पराभवाचा स्वीकार  title=
संग्रहित छायाचित्र

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आणि पाहतापाहता भाजपच्या अपेक्षित यशाला कुठेतरी गालबोट लागल्याचं स्पष्ट होत गेलं. विजयासाठीचा अपेक्षित आकडा सांगणाऱ्या भाजपला काहीसा धक्का बसला. ज्याचा प्रत्यय साऱ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या मराठवाड्याच्या राजकीय पटलावरही पाहायला मिळाला. येथील परळी मतदार संघाकडे सर्वाधिक तुल्यबळ लढत पाहायला मिळाली होती. पंकजा मुंडे विरुद्ध धनंजय मुंडे अशा एकंदर लढतीत राष्ट्रवादीच्या धनंजय मुंडे यांनी बाजी मारली. 

भाजपच्या पंकजा मुंडे यांना पराभूत करत धनंजय मुंडे यांनी परळीचा गड राखला. ज्यानंतर पत्रकार परिषद घेत आपल्याला जनतेचा निर्णय मान्य असल्याचं म्हणत  लोकांनी माझा स्वीकार केला नाही यावर भर देत पंकजा मुंडे यांनी आपला पराभव स्वीकारला. 

LIVE निकाल महाराष्ट्राचा : मराठवाडा 

मी हा पराभव स्वीकारते, पुढे या पराभवाची समीक्षा आपण करु असं म्हणत मताधिक्य मिळालेल्यांनाही विजय अनाकलनीय आहे ही बाब पंकजा यांनी अधोरेखित केली.  गेल्या काही दिवसांमधील राजकीय पटलावरच्या घडामोडी पाहताना पैशांचा मोठ्या प्रमाणात वापर केला गेला का, असा प्रश्न विचारला असता यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं. शिवाय सध्या आपण यावर काही बोलू इच्छित नसून, त्याविषयीचा खुलासा भविष्यात होईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. 

पक्षाच्या वतीने निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या ज्या उमेदवारांसाठी प्रचार केला त्यांच्या विजयासाठी पंकजा यांनी शुभेच्छाही दिल्या. माध्यमांशी संवाद साधताना कदाचित मी स्वत:ला निवडून आणण्यासाठी सक्षम नाही असं वक्तव्य करत त्यांनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं.  

आपल्या अखेरच्या प्रचारसभेत अतिशय भावूक वातावरणात 'तुम्ही मुक्त व्हा नाहीतर मला मुक्त करा असं' आवाहनच केलं होतं, हे पुन्हा आठवून देत गलिच्छ राजकारणातून मुक्त करावं असं मी स्वत: जनतेला सांगितलं होतं, हेसुद्धा त्यांनी यावेळी सर्वांच्या लक्षात आणून दिलं. आपल्या जिल्ह्यासाठी आतापर्यंत बरंच काम केलं, तेव्हा आता पुढे याच बदलांसाठी काय कामं केली जातात याबद्दलचा आशावाद त्यांनी व्यक्त केला.  

'मी गोपीनाथ मुंडेंची कन्या... त्यांची शिकवण लक्षात ठेवणार....' 

'मी कायमच गोपीनाथ मुंडे यांचीच कन्या म्हणून समोर येईन', असं म्हणत सर्वांच्या विजयात सहभागी होऊन पराभव स्वत:च्या बळावर स्वीकारण्याच्या वडिलांनी दिलेल्या शिकवणुकीवर चालेन असंही त्या म्हणाल्या.