भाजप - शिवसेनेला एकत्र निवडणुका लढवायच्या आहेत - दानवे

'आम्हाला एकत्र निवडणुका लढवायच्या आहेत, मात्र अजून शिवसेनेशी बोलणी सुरू झालेली नाहीत 'असे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये केले. 

Updated: Jan 17, 2019, 07:49 PM IST
भाजप - शिवसेनेला एकत्र निवडणुका लढवायच्या आहेत - दानवे title=

पिंपरी-चिंचवड : 'आम्हाला एकत्र निवडणुका लढवायच्या आहेत, मात्र अजून शिवसेनेशी बोलणी सुरू झालेली नाहीत 'असे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये केले. 'आम्ही सर्व मतदार संघांचा आढावा घेत आहे. मात्र, त्याचा फायदा मित्रपक्षाला होईल, तर त्यांच्या कामाचा फायदा आम्हाला होईल, असेही दानवे म्हणालेत. मात्र, अद्यापही युतीची बोलणी सुरू झालेली नसल्याचा पुनरुच्चार दानवे यांनी केला आहे. समविचारी पक्षांना बरोबर घेण्याचा विचार आहे. मात्र, कोणी आले नाही तर स्वबळावर लढू असेही दानवेंनी स्पष्ट केले आहे. ४१ मतदार संघांचा आढावा घेतला. युती झाली नाही तर ४० जागा निवडून आणू, असा दावाही रावसाहेब दानवे यांनी केला. तर सर्वोच्च न्यायालयाच्या डान्स बारवरील निर्णयावर भूमिका मांडताना डान्स बार बंद व्हावेत, हीच भूमिका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. 

भाजपकडून ४१ मतदार संघाचा आढावा

याआधी शिवसेनेने स्वबळाचा नारा दिला आहे. तसेच शिवसेनेकडून सातत्याने भाजपवर टीका करण्यात येत आहे. भाजपला अनेक प्रश्नांवर धारेवर धरण्याचे काम शिवसेनेकडून करण्यात येत आहे. असे असताना भाजपने मवाळ  भूमिका घेतली आहे. शिवसेनेला हरतऱ्हेंने मनविण्याचे काम सुरु आहे. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडीसाठी जोरदार प्रयत्न केले आहे. त्यामुळे राज्यात युती झाली नाही तर याचा फटका भाजपला बसेल. हा धोका लक्षात घेऊन भाजपने शिवसेनेला चुचकरण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे. भाजपने शिवसेना सोबत आली तर ठिक अन्यथा एकटे लढण्याचा निर्धार केला. मात्र, पुन्हा पुन्हा युतीवर भाजपकडून भाष्य करण्यात येत आहे. प्रदेश अध्यक्ष दानवे यांनी म्हटले आहे. भाजपला मित्र पक्षांना बरोबर घेऊन निवडणूक लढवायची आहे, पण कोणी आमच्या बरोबर येत नसेल तर भाजप स्वबळावर निवडणूक लढेल आणि जिंकून येईल, असे म्हटले. दानवे यांनी पिंपरी चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत याबाबत पुन्हा भाष्य केले. आम्ही आतापर्यंत ४१ लोकसभा मतदार संघाचा आढावा घेतला आहे. शिवसेनेशी युती करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र अजून युतीबाबत बोलणी सुरु झालेले नाहीत, असेही स्पष्ट केले.

अजित पवार जेलमध्ये जाणार?

दरम्यान, त्यांना विचारलेल्या एका प्रश्नावर राष्ट्रवादीचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे केव्हाही जेलमध्ये जाऊ शकतात, असे म्हणालेत. अजित पवार हे जेलमध्ये जाऊ शकतात, याचा पुनरउच्चार त्यांनी केला. डान्सबार बाबतचा निकाल मी अजून पाहिलेला नाही मात्र डान्स बार बंद राहावेत ही आमची भूमिका आहे, असे ही दानवे म्हणाले. किरीट सोमय्या यांनी प्रचार सुरु केला असेल तर चांगले आहे, असे उत्तर दानवे यांनी दिले. तर शस्त्रास्त्र साठा जप्त केलेल्या धनंजय कुलकर्णी यावर बोलणे दानवे यांनी टाळले.