‘मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांना एसटी बसने कोकणात सोडा’

भाजप नेत्यांची मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे मागणी

Updated: Apr 23, 2020, 04:15 PM IST
‘मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांना एसटी बसने कोकणात सोडा’ title=

प्रणव पोळेकर, रत्नागिरी :  कोरोना लॉकडाऊनमुळे अनेक लोक वेगवेगळ्या ठिकाणी अडकून पडले आहेत. ठिकठिकाणी अडकलेल्या परप्रांतातील मजुरांना त्यांच्या गावी सोडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्र सरकारला विनंती करत आहेत. आता मुंबई आणि पुण्यात असलेल्या कोकणातील लोकांना त्यांच्या गावी सोडण्याची मागणी कोकणातील भाजप नेत्यांनी केली आहे.

मुंबई, पुण्यात राहणारे कोकणातील चाकरमानी शाळांना सुट्टी पडल्यानंतर एप्रिल आणि मे महिन्यांत मोठ्या प्रमाणात गावी जातात. यावर्षी मार्च महिन्यापासूनच शाळा बंद करण्यात आल्या आहेत, तसेच शालेय परीक्षाही रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे अनेक मुंबई, पुणेकरांची कोकणातल्या गावी जायची इच्छा आहे. पण लॉकडाऊनमुळे त्यांना ते शक्य झालेले नाही. त्यामुळे सोशल मीडिया आणि अन्य माध्यमातून मोहीम चालवून अनेक लोक गावी जाण्याची परवानगी मिळावी म्हणून प्रयत्न करत आहेत. लॉकडाऊनच्या नियमांमुळे आणि कोरोनाच्या पसरण्याच्या धोक्यामुळे सरकारने याबाबत काही निर्णय घेतलेला नाही.

परप्रांतिय मजुरांना त्यांच्या गावी सोडावे अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केल्यानंतर आता मुंबई, पुण्यातील चाकरमान्यांना कोकणात पाठवण्याच्या मागणीला बळ मिळाले आहे. भाजपचे माजी आमदार प्रमोद जठार आणि रत्नागिरीचे अध्यक्ष डॉ. विनय नातू यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून तशी मागणी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात डॉ. विनय नातू यांनी म्हटले आहे की, मुंबईत अनेक लोक १० बाय १० च्या छोट्या खोलीत दाटीवाटीने राहतात. सार्वजनिक स्वच्छतागृहे असल्याने त्यांना गावी यायचे आहे. त्यामुळे परप्रांतीय मजुरांना जसे विशेष रेल्वेने त्यांच्या गावी सोडण्याचे प्रयत्न सुरु आहेत, तसेच मुंबईतील लोकांना एसटी बसने कोकणात सोडण्याची व्यवस्था करण्यात यावी.

प्रमोद जठार यांनीही अशीच मागणी केली आहे. मुंबई, ठाणे, पालघर परिसरात राहणारे तसेच पुण्यात राहणाऱ्या कोकणातील लोकांना त्यांच्या गावी येण्यासाठी एसटीची सोय करावी अशी मागणी जठार यांनी केली आहे.

 

कोरोनाच्या भीतीमुळे लॉकडाऊन सुरु होण्याआधी एक-दोन दिवस आणि सुरु झाल्यानंतर अनेक लोकांनी कोकणात गावी जाण्याचा प्रयत्न केला. काही ठिकाणी गावकऱ्यांनी बाहेरील लोकांना गावात येण्यापासून रोखण्याचे प्रकारही घडले. कोरोनाच्या भीतीमुळे गावकरीही धास्तावलेले असल्याने मुंबईतील चाकरमान्यांबरोबर कोरोना गावात येणार नाही ना अशी भीती त्यांच्या मनात आहे. त्यामुळे कोकणातील लोकांना गावी सोडण्याचा निर्णय झालाच, तर कोरोना पसरणार नाही याची खबरदारीही प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. त्यामुळे राज्य सरकार भाजप नेत्यांच्या मागणीवर काय निर्णय घेणार याची उत्सुकता आहे.