भाजपकडून २२ तारखेला 'महाराष्ट्र बचाव' आंदोलनाची हाक

स्थलांतरित मजूर राज्य सोडून जाणार नाहीत, यासाठी राज्य सरकारने काय केले?

Updated: May 20, 2020, 03:52 PM IST
भाजपकडून २२ तारखेला 'महाराष्ट्र बचाव' आंदोलनाची हाक title=

प्रताप नाईक, झी मीडिया, कोल्हापूर: राज्यात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याचे सांगत भाजपने येत्या २२ तारखेला 'महाराष्ट्र बचाव' आंदोलनाची हाक दिली आहे. २२ मे रोजी सकाळी ११ वाजता जनतेने हे आंदोलन करून आपला निषेध नोंदवावा, असे आवाहन भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. 

यावेळी त्यांनी महाविकासआघाडी सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढले. स्थलांतरित मजुरांना गावी जाण्यासाठी ट्रेनचा प्रवास मोफत केला पाहिजे, असे विरोधक सांगतात. मात्र, स्थलांतरित मजुरांनी आहे त्याच ठिकाणी राहावे, असे केंद्राचे म्हणणे होते. परंतु, महाराष्ट्रातील सरकार स्थलांतरित मजुरांना मदत करण्यात अपयशी ठरले. त्यांच्यासाठी राज्य सरकारने निवारा केंद्रे उभारली नाहीत. केंद्राने मदत व पुनर्वसनासाठी राज्याला १६०० कोटी रुपये दिले होते. या पैशांचा वापर मजुरांसाठी केला जाणे अपेक्षित होते. मात्र, सरकारने तसे केले नाही. त्यामुळे मजूर गावाकडे परतत आहेत. 

उद्धव ठाकरेंनी महाआघाडी तोडावी अन्यथा...सुब्रमण्यम स्वामींचा इशारा

याशिवाय, केंद्र सरकार स्थलांतरित मजुरांच्या ट्रेनच्या तिकिटाचा एक तृतीयांश खर्च करत आहे. तर दुसरीकडे राज्य सरकार मजुरांना एसटीने सोडत असले तरी त्यासाठी दुप्पट पैसे आकारत आहे. मुळात स्थलांतरित मजूर राज्य सोडून जाणार नाहीत, यासाठी राज्य सरकारने काय केले, हे सांगावे, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला. 

मंत्रालयात खळबळ, आणखी एका प्रधान सचिवांना कोरोनाची लागण

कोरोना राज्यात येऊन ६० दिवस उलटले. तरीदेखील राज्य सरकारने काहीच केलेले नाही. त्यामुळे आम्ही २२ तारखेला महाराष्ट्र बचाव आंदोलन करुन सरकारला जाब विचारणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.