अशोक चव्हाणांना दे धक्का देण्यासाठी भाजपचे फोडाफोडीचे राजकारण

कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडकडे भाजपने आपला मोर्चा वळवलाय.  

Updated: Aug 17, 2017, 07:44 PM IST
अशोक चव्हाणांना दे धक्का देण्यासाठी भाजपचे फोडाफोडीचे राजकारण title=

नांदेड : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांचा बालेकिल्ला असलेल्या नांदेडकडे भाजपने आपला मोर्चा वळवलाय. येत्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या नांदेड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभीमीवर भाजपने फोडाफोडीचे राजकारण सुरु केले आहे. 

नांदेड महापालिकेच्या १३ नगरसेवकांनी राजीनामे देऊन भाजपमध्ये प्रवेश केलाय. त्यामुळे लातूर प्रमाणेचे नांदेड महापालिका निवडणुकीत चव्हाणांना मात देण्यात भाजपाला यश येतं का याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

नांदेड महापालिका निवडणुकीत काँग्रेसला दे धक्का देण्यासाठी भाजपा सरसावलीय. १३ नगरसेवक फोडून भाजपनं त्याची झलकही दाखवलीय. काँग्रेस, शिवसेनेचे प्रत्येकी ५ आणि राष्ट्रवादीचे ३ नगरसवेक भाजपानं आपल्या जाळ्यात ओढलेत. शिवसेना जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख, शिवसेना महानगराध्यक्ष महेश खोमणे आणि मनसे जिल्हाध्यक्ष विनोद पावडेही भाजपच्या गळाला लागलेत. 

पक्षातून बाहेर पडल्यानंतर या सर्वच नगरसेवकांनी आपापल्या पूर्वीच्या पक्षावर टीकेची झोड उठवलीय. २००८ मध्ये गुरुतागद्दीच्या निमित्ताने काँग्रेसने भ्रष्टाचार केल्याचा आरोप पूर्वाश्रमीचे काँग्रेस नगरसेवक सरजितसिंग गिल यांनी केलाय. 

काँग्रेसच्या ५ नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला असला तरी पक्षाला काहीही फरक पडणार नसल्याची प्रतिक्रिया अशोक चव्हाणांचे निकटवर्तीय देतायत. दरम्यान या फोडाफोडीच्या राजकारणामध्ये शिवसेना आमदार प्रताप पाटील चिखलीकरांचा हात असल्याचा आरोप होतोय. 

मुख्यमंत्री आणि चिखलीकरांची जवळीक वाढल्यानंतर भाजपनं चिखलीकरांच्या हाती सूत्र सोपवली. चिखलीकरांनी याचा इन्कार केला असला तरी शिवसेनेच्या स्थानिक पदाधिका-यांनी मात्र थेट आरोप केलाय. इतर पक्षातल्या १३ नगरसेवकांच्या इनकमिंगमुळे भाजपनं आपले मनसुबे स्पष्ट केलेत. त्यामुळे आता महापालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध अशोक चव्हाण असा सामना रंगण्याची चिन्हे आहेत.