कोकण रेल्वे कामगारांना बोनस जाहीर

कोकण रेल्वे कामगारांना बोनस जाहीर करण्यात आलाय.

सुरेंद्र गांगण | Updated: Oct 16, 2018, 11:54 PM IST
कोकण रेल्वे कामगारांना बोनस जाहीर title=

मुंबई : कोकण रेल्वे कामगारांना भारतीय रेल्वे प्रमाणे बोनस द्यावा, अशी मागणी कोकण रेल्वे कामगार सेनेने प्रशासनाकडे केली. या मागणीची दखल रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी घेत कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांनाही सतरा हजार असा दिवाळाचा बोनस जाहीर केलाय. या घोषणेनंतर कोकण रेल्वे कामगार सेनेच्यावतीने जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी फटाके फोडून आपला आनंद कोकण रेल्वे कामगारांनी व्यक्त केला.

सप्टेंबर महिन्यात कामगार सेनेच्या शिष्टमंडळाला बोनस दिला जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. दरम्यान, भारतीय रेल्वे प्रमाणे बोनस देण्यास टाळाटाळ झाल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाला देण्यात आला होता. कोकण रेल्वे कामगारांना भारतीय रेल्वेप्रमाणे बोनस द्यावा, या मागणीसाठी एका शिष्टमंडळाने रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष आनंदरावर आडसूळ, सरचिटणीस दिवाकर देव यांच्या मार्गदर्शनाखाली कोकण रेल्वेचे संचालक संजय गुप्ता आणि डीएफ अमिताभ बॅनर्जी यांची भेट घेतली आणि चर्चा केली होती.  

दरम्यान, शिवसेना नेते खासदार आनंदराव अडसुळ यांनी, कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर देव, संयुक्तचिटणीस नरेंद्र शिंदे कोंकण युनिट केन्द्रीय कमेटीचे सरचिटणीस राजू सुरती, संपर्क प्रमुख आशुतोष शुक्ला, विलास खेडेकर आदीं पदाधिकाऱ्यांनी भारतीय रेल्वे प्रमाणे बोनस मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. 

कोकण रेल्वे कर्मचाऱ्यांना 17 हजार रुपये बोनस जाहीर करण्यात आलाय. हे वृत्त समजताच रत्नागिरी स्टेशन, रत्नागिरी RRM ऑफिस. मडगाव स्टेशन, सावंतवाडी स्टेशन, कुडाळ स्टेशन, बेलापूर कार्यालयासमोर कर्मचाऱ्यांनी रेल कामगार सेना झिंदाबादच्या घोषणा देत फटाक्यांची आतषबाजी करून या निर्णयाचं स्वागत केले.