एक गाव लय भारी, बोपगावाची रीतच न्यारी

गावपातळीवरचं राजकारण म्हटले की बिनविरोध निवडणूका होणे तसे अशक्य. पण...

Updated: Jan 6, 2021, 01:23 PM IST
एक गाव लय भारी, बोपगावाची रीतच न्यारी

किरण ताजणे, पुणे : गावपातळीवरचं राजकारण म्हटले की बिनविरोध निवडणूका होणे तसे अशक्य. त्यात ग्रामपंचायतीचा विषय असेल तर भाऊबंदकी, हाणामाऱ्या आणि गावगुंड यामुळे निवडणुका मोठ्या चुरशीच्या होतात. मात्र या सगळ्या विषयांना फाटा देत पुण्यातल्या (Pune) बोपगावाने निवडणूक (Bopgaon Gram Panchayat) बिनविरोध केली आहे. नऊच्या नऊ जागांवर महिलांना (Women) संधी देत आदर्श निर्माण केला आहे.

राज्यात ग्रामपंचायत निवडणुकांचे (Gram Panchayat election) बिगुल वाजले आहे. त्यामुळे गावोगावी लगबग आहे. त्यात उठून दिसतंय ते पुण्यातल्या इंदापूर तालुक्यातलं बोपगाव. बोपगाव ग्रामस्थांनी महिलांना संधी देत आदर्श निर्माण केला आहे. तीन हजाराच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या गावात जवळपास बावीसशे मतदान आहे. या गावानं ग्रामपंचायत निवडणुकीत महिलांना संधी द्यायचं ठरवले आहे. 

गावात मूलभूत सुविधांबरोबर विद्यार्थी आणि महिलांच्या प्रश्नांवर या  महिलांचा भर असणार आहे. या गावात बिनविरोध निवडणूक तशी आजपर्यंत झालेली नव्हती. मात्र गावातील पुढाऱ्यांनी एकत्र येऊन ही संकल्पना मांडत प्रत्यक्षात उतरवली आहे.

गावाकडचं राजकारण म्हंटलं तर त्यात महिला फक्त नामधारीच असतात. त्यामुळे महिलांना संधी दिली असली तरी प्रत्यक्षात काम करू देण्याची ही गरज आहे.