विकास भोसले, झी मीडिया, सातारा : माळीणसारखी दुर्घटना घडल्याची प्रशासन वाटत पहात आहे का? असा सवाल साताऱ्यातले बोरगेवाडी ग्रामस्थ विचारत आहेत.
सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यामधल्या कड्याखालचं बोरगेवाडी गाव गेल्या साठ वर्षांपासून भयानक मृत्यूच्या छायेत वावरतंय... गावावर वरच्या बाजूस असणारा कडा कधीही कोसळू शकतो... शासनाकडून गावाचं योग्य पुनर्वसन करण्यास टाळाटाळ होतेय... केवळ बोरगेवाडीचं नव्हे तर तीन गावं डोंगराखाली वसलीयत. डोंगराचा कडा तुटल्यानं त्यांना पावसाळ्यात जीव मुठीत धरुन जगावं लागतंय. गेल्या दोन वर्षांपासून पुनर्वसन सुरू झालं परंतु शासनानं निकृष्ट घरं दिल्यानं ग्रामस्थांनी विरोध केलंय. अजूनही ३८ कुटुंबांचं पुनर्वसन होणं बाकी आहे. शासनाला आम्हाला जिवंत गाडायचं आहे का? असा सवाल इथले ग्रामस्थ करत आहेत.
या गावातल्या ३८ कुटुंबातल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवून त्यांना कायमस्वरुपी सोईसुविधा उपलब्ध करुन द्याव्यात अन्यथा आंदोलन करु असा इशारा सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रम बाबा पाटणकर यांनी दिलाय.
प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ग्रामस्थांचे प्राण जावू शकतात. रखडलेलं पुनर्वसन लवकर व्हावं अन्यथा मोठी दुर्घटना कधीही घडू शकते, यासाठी प्रशासनानं लवकरात लवकर निर्णय घेण्याची गरज आहे.