नागपूर पुन्हा हादरले; प्रियकराकडून प्रेयसीची हत्या

नागपूरमधील धक्कादायक घटना

Updated: Jul 14, 2019, 06:09 PM IST
नागपूर पुन्हा हादरले; प्रियकराकडून प्रेयसीची हत्या  title=

अमर काणे, झी मीडिया, नागपूर : नागपूर एका खुनाने हादरले आहे. प्रियकरानेच प्रेयसीचा खून केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये घडली आहे. खुशी परमार असे हत्या करण्यात आलेल्या मुलीचे नाव असून, अश्रफ या तिच्या प्रियकरानेच तिची हत्या केली आहे. काही महिन्यांपूर्वी खुशी आणि अश्रफ या दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. खुशीची परिस्थिती गरिबीची असून तिचे आई वडील मोलमजुरी करतात. पण खुशी नेहमी फॅशनेबल राहायची. ती आईवडिलांबरोबर राहत नव्हती, त्यांच्याशी बोलतही नव्हती. 

खुशी गेल्या काही दिवसांपासून इतर तरुणांबरोबर राहायची. त्यामुळे अश्रफ आणि खुशीमध्ये खटके उडू लागले होते. शुक्रवारी रात्री वाद झाल्यानंतर लाँग ड्राइव्हच्या बहाण्याने अश्रफ खुशीला नागपूर - पांढुर्णा मार्गावर घेऊन गेला. गाडीतच अश्रफने तिला मारहाण केली. त्यानंतर जड वस्तूंनी तिच्या डोक्यावर प्रहार करुन तिची हत्या केली.

खुशीची ओळख पटू नये, म्हणून अश्रफने दगडाने तिचे डोके ठेचले, चेहऱ्यावर अॅसिडही टाकले. तिचा एक हातही कापला. पण शरीरावरच्या टँटूंवरुन खुशीची ओळख पटली.

अश्रफचं झिंगाबाईट टाकळी पसिरात कट झोन नावाचे सलून आहे. अश्रफ कुख्यात गुंड अफसर अंडाचा मुलगा आहे. अश्रफने हत्येची कबुली दिली आहे. मात्र खुशीच्या हत्येने एका विचित्र प्रेमकहाणीचा रक्तरंजित अंत झाला असून, या खूनामुळे नागपूरमधली असुरक्षितता पुन्हा एकदा समोर आली आहे.