अमरावती शिवसेना वाद : अनंत गुढेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

 अनंत गुढे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. 

Updated: Jul 14, 2019, 03:04 PM IST
अमरावती शिवसेना वाद : अनंत गुढेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट  title=

अमरावती : माजी खासदार अनंत गुढे आणि शिवसेना नेते अभिजीत अडसूळ यांच्यातील वाद विकोपाला पेटला आहे. गुढे यांची पक्षातून हकालपट्टी करा असे आवाहन अडसूळ यांनी पक्षप्रमुखांना केले. या पार्श्वभुमीवर अनंत गुढे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मी माझे म्हणणे पक्षप्रमुखांसमोर मांडल्याचे ते म्हणाले. शिवसेना माझी आई आहे तर मातोश्री हे मंदिर आहे. निवडणुकीपूर्वी महाशिवरात्रीला स्मशानभूमीत झालेल्या सर्वपक्षीय कार्यक्रमाचा तो व्हिडिओ आहे. त्या व्हिडिओने कोणी दुखावले असेल तर मी माफी मागतो असे गुढे म्हणाले. माझ्या हकालपट्टीच्या मागणीबद्दल उद्धव ठाकरे निर्णय घेतील असेही ते म्हणाले. 

हा संघटनात्मक वाद असून तो आता मिटला आहे. दोघांमध्ये संवाद झाला असून वाद मिटवण्यासाठी पक्षप्रमुख सक्षम असल्याचे शिवसेना नेते अनिल देसाई यांनी म्हटले.

काय आहेत आरोप ?

गुढे यांनी लोकसभा निवडणूकीत विद्यमान खासदार नवनित राणा यांना मदत केल्याचा आरोप करत गुढे यांना मातोश्रीवर थारा नको, गुढे गद्दार आहेत असा आक्षेप माजी आमदार आणि  कॅप्टन अभिजीत अडसूळ यांनी केलाय. अभिजीत हे नवनित राणा यांच्याकडून पराभूत झालेले शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव आहेत. अनंत गुढे हे आनंदराव अडसुळांचा प्रचार करताना कधी दिसले नाहीत. त्यामुळे अशा गद्दारांची पक्षातून हकालपट्टी करा अशी मागणी अभिजीत अडसूळ यांनी केली आहे.