सांगली : राम मंदिर परिसरात राहणाऱ्या शासकीय कंत्राटदार आणि बांधकाम व्यावसायिक माणिकराव पाटील यांचे त्याच्या गाडीसह अपहरण केल्याची घटना उघडकीस आली. सदरची घटना ही 13 ऑगस्ट रोजी रात्री साडे आठ ते पाऊणे नऊ वाजण्याच्या सुमारास मिणचे मळा ते तुंगकडे जाणाऱ्या रोडवर घडली. तुंग येथे प्लॉट दाखवण्याचा बहाणा करून तुंग येथील नेऊन त्यांचे अपहरण करण्यात आले होते. याबाबत त्यांच्या मुलाने सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. (Builder was kidnapped and then killed)
पोलिसांनी तातडीने शोधाशोध केली असता काल रात्री त्यांची गाडी कोल्हापूर जिल्ह्यातील एका गावात सापडली होती. आज सकाळच्या सुमारास सांगली जिल्ह्यातील कवठेपिरान गावच्या हद्दीत नदी पात्रात एक मृतदेह तरंगताना आढळला.
नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी तातडीने धाव घेत पाहणी केली असता हा मृतदेह पाटील यांचा असल्याचे निष्पन्न झाले. घडलेल्या या प्रकारामुळे पोलिसही चकरवले. या प्रकरणी पोलिसांनी चौकशी सुरू केली असून घातपताची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
माणिकराव विठ्ठल पाटील (वय ५४) असे अपहरण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी विक्रमसिंह माणिकराव पाटील (वय २८) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात अपहरणकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पाटील यांना जागा दाखवण्यासाठी बोलावून घेत अपहरण केल्याची माहिती पोलीस तपासात पुढे येत आहे.