Nashik Sinnar Shirdi Accident : कल्याणमधील १७ वर्षीय कबड्डीपटूचा दुर्दैवी अंत!

दिक्षा तिच्या नातेवाईकांबरोबर शिर्डीला गेली होती. दरवर्षी तिचे कुटुंबीय न चुकता शिर्डीला जायचे. यंदाही ती आई-वडील आणि काकीबरोबर शिर्डीला दर्शनसाठी गेली होती.

Updated: Jan 14, 2023, 01:37 PM IST
Nashik Sinnar Shirdi Accident : कल्याणमधील १७ वर्षीय कबड्डीपटूचा दुर्दैवी अंत! title=

Bus Accident Shirdi: शुक्रवारी नाशिकमध्ये झालेल्या बस अपघातामध्ये एक नवोदित कबड्डीपटूनेही प्राण गमावला आहे. कल्याणमधील १७ वर्षीय कब्बडीपटू दिक्षा गोंधळी (Diksha Gondhali) हिचा शुक्रवारी झालेल्या बस अपघातात मृत्यू झाला आहे. दिक्षा तिच्या आई-वडिलांबरोबर शिर्डीला गेली होती. दुर्देवाने ज्या बसला अपघात झाला त्या बसमधूनच दिक्षा आणि तिचे आई-वडील प्रवास करत होते. या अपघातामध्ये दिक्षाची आईसुद्धा गंभीर जखमी झाली आहे. दिक्षाची बहीण समिक्षाला क्लासला सुट्टी नसल्याने ती शिर्डीला गेली नव्हती. त्यामुळेच तिचा जीव वाचला.

कल्याणमधील चिंचपाडा येथे दिक्षा तिच्या कुटुंबियांबरोबर राहत होती. मोरीवला गावात दिक्षाचे चुलते राहतात. त्यांच्या कुटुंबियांबरोबर दिक्षा आपल्या पालकांसहीत शिर्डीला गेली होती. दरवर्षी गोंधळी कुटुंब आवर्जून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी जायचं. दिक्षा डोंबिवलीमधील मॉडेल कॉलेजमध्ये 11 वी म्हणजेच एफव्हायजेसीला शिकत होती. कॉलेजमध्येही ती कबड्डी आणि शॉर्ट बॉल खेळात भाग घ्यायची. दिक्षाचे वडील ठाण्यामध्ये खासगी कंपनीत कामाला होते. दिक्षाच्या चुलतीचाही या अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. त्या ४५ वर्षांच्या होत्या.

कल्याणमधील शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष आणि नगरसेवक महेश गायकवाड यांनी दिक्षाच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. अंबरनाथहून 725 भाविकांनी घेऊन शिर्डीला गेलेल्या 15 बसपैकी एक बसला अपघात झाल्याने त्या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाला.