शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह देणाऱ्या जिल्ह्याचा पक्ष नेतृत्वाला विसर

शिवसेनेचे बाल्लेकिल्ले म्हणून प्रचलित असलेल्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्याला मात्र या मंत्रीमंडळात स्थान मिळालेले नाही.  

Updated: Dec 31, 2019, 09:46 PM IST
शिवसेनेला धनुष्यबाण चिन्ह देणाऱ्या जिल्ह्याचा पक्ष नेतृत्वाला विसर title=
संग्रहित छाया

गजानन देशमुख / परभणी : राज्यातील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळाचा काल विस्तार झाला. शिवसेनेचे बाल्लेकिल्ले म्हणून प्रचलित असलेल्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्याला मात्र या मंत्रीमंडळात स्थान मिळालेले नाही. ज्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्याने सुरुवातील दोन खासदार निवडून दिले. शिवसेनेला राजकीय पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळवून दिले. त्या परभणी जिल्ह्याचा शिवसेनेला विसर पडला आहे. या जिल्ह्याला मंत्रिमंडळात स्थान मिळणे गरजेचे होते. दरम्यान, शिवसेनेचे राहुल पाटील यांचे नाव चर्चेत असतांना त्यांना ही शेवटच्या क्षणी पक्षश्रेष्टींनी डावल्याचा आरोप होत आहे.

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय असलेले परभणीचे आमदार राहुल पाटलांच्या गळ्यात राज्यमंत्री पदाची माळ पडेल अशी परभणीकरांना आणि  शिवसैनिकांना आशा होती. राहुल पाटील उच्च शिक्षित आहेत. त्यांनी ८२ हजारांचे मताधिक्य घेऊन दुसर्‍यांदा विजय मिळवला. शिवाय अनेक वर्षांपासून परभणीवर अन्याय झाला आहे. एकदा ही परभणीला शिवसेनेने मंत्रिपद दिलेले नाही. शिवसेनेला राजकीय पक्ष  म्हणून मान्यता आणि धण्युष्य बाण हे चिन्ह मिळवून देणारे परभणी आणि हिंगोली हे दोन जिल्हे आहेत. 

परभणीचा सात वेळ आमदार आणि एक वेळ अपवाद सोडता सहा वेळा खासदार निवडून देण्याची किमया परभणीकरांनी केली आहे. आता शिवसेनेचे सरकार आहे. परभणी-हिंगोलीकरांनी शिवसेनेला भरभरून दिल आहे. यावेळी शिवसेनेची वेळ होती. पण शिवसेनेने शिवसैनिकांची घोर निराशा केली, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. 

'काय अवस्था झालेय'

हिंगोलीतूनही एक खासदार आणि किमान एक आमदार हिंगोलीकरांनी आजपर्यंत शिवसेनेचा दिला आहे. परभणी हिंगोली जिल्ह्याची बकाल अवस्था झाली आहे. ना उद्योग जिल्हा, शिक्षणाची सोय नाही, दळणवळणाच्या सुविधा नाहीत, शेतीवर आधारित एकही व्यवसाय नाही. आत्महत्यांचा जिल्हा अशी या जिल्ह्याची ओळख निर्माण झाली आहे. कोणत्याही जिल्ह्याचा चिरंतन विकास करायचं असेल तर जिल्ह्याला मंत्रिपद मिळायला पाहिजेत किंवा तळमळीने काम करणारा पालकमंत्री असावा लागतो. झेंडामंत्री आता या जिल्ह्याला नकोत, येवढीच अपेक्षा आता परभणी आणि हिंगोलीकर महाविकास आघाडीकडून मतदारांकडून करण्यात येत आहे.