Cidco Lottery 2024: हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. सिडकोच्या महागृहनिर्माण योजनेतील घरांची नोंदणी करण्यासाठी सिडकोने एका महिन्याची मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे विविध कारणांमुळे ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याचे राहून गेलेल्या ग्राहकांना आणखी एक संधी उपलब्ध होणार आहे. मुदतवाढ मिळाल्यामुळं आता ग्राहकांनी अधिकाधिक अर्ज नोंदणी करून हक्काच्या घराची स्वप्नपूर्तता करावी, असे आवाहन सिडकोच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे.
सिडकोने अर्ज नोंदणीसाठी 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. दिवाळी आणि निवडणुका यामुळं अनेकांना ऑनलाइन अर्जासाठी नोंदणी करता आलेली नव्हती यासाठीच सिडकोने मुदतवाढ दिली आहे. सिडकोच्या घरांसाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबरपर्यंत होती. सोमवारी म्हणजेच आज अर्ज नोंदणीचा शेवटचा दिवस होता. मात्र आता सिडकोने घरांसाठीच्या अर्ज नोंदणीसाठी मुदतवाढ दिली आहे.
रविवार संध्याकाळपर्यंत तब्बल ८१ हजार ९०० ग्राहकांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. त्यापैकी २२ हजार २१ ग्राहकांनी अर्ज नोंदणी शुल्काचा भरणा केला आहे. हा आकडा उपलब्ध घरांच्या संख्येपेक्षा कमी असल्याने संगणकीय सोडत काढताना तांत्रिक अडचणी उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे अर्ज नोंदणीसाठी एक महिन्याची मुदतवाढ दिल्याचे समजते.
सिडकोच्या माध्यमातून शहराच्या विविध नोडमधील २७ ठिकाणी ६७ हजार घरे बांधली जात आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यातील ४३ हजार घरांना 'महारेरा'ची परवानगी प्राप्त झाली असून, त्यांचे बांधकामही प्रगतिपथावर आहे. त्यातील २६ हजार घरांची योजना ११ ऑक्टोबरपासून सुरू करण्यात आली आहे.
सिडको लॉटरीमध्ये लागलेले घर लीजवर न राहता ते सदर व्यक्तीच्या मालकीचे होणार आहे. या निर्णयाच्या आधी ही घरे विकण्यासाठी सीडको महामंडळाची एनओसी घ्यावी लागत असे. याशिवाय ही घरे विक्री करत असताना निश्चित शुल्कही भरावे लागत असे. मात्र आता अर्जदारांना ही घरे विनात्रास विकता येणार आहे. त्याचा फायदा असंख्य सिडको गृहधारकांना होणार आहे.